'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:55 PM2022-06-13T12:55:03+5:302022-06-13T12:59:03+5:30

आलिशान बंगल्यात गर्भवतींसाठी स्वतंत्र खोली; चार महिन्यांत दीडशेवर गर्भलिंगनिदान केल्याचा संशय आहे

'Boy P, Girl N'; Market filled for gender diagnosis by Anganwadi worker with trainee doctor | 'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार

'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार

googlenewsNext

बीड : अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिकाऊ डॉक्टर सतीश बाळू सोनवणे (वय २५, रा. जाधववाडी, ता.जि. औरंगाबाद) यास गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथील एका हॉटेलात १२ जून रोजी सकाळी बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले असून, चार महिन्यांपासून तो अर्धमसला (ता. गेवराई) येथील अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिच्या संपर्कात होता. २८ वेळा तो गेवराईला लिंगनिदानासाठी येऊन गेला. या कालावधीत त्याने दीडशेवर महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याची माहिती उजेडात आली आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने पोलीस तपासाच्या संथगतीवर प्रकाश टाकून हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर यंत्रणा हलली व मुख्य आरोपीला अटक झाल्याने तपासाला गती येणार आहे.

तालुक्यातील बक्करवाडी येथील सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (३०) हिचा चौथ्यांदा गर्भपात करताना अतिरक्तस्राव होऊन ५ जून रोजी मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपाताचा भंडाफोड झाला होता. उत्तरीय तपासणी अहवालानंतर पिंपळनेर ठाण्यात मृत सीताचा पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बक्करवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. श्रृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा. अर्धमसला, ता. गेवराई, हमु. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आर्दशनगर, बीड) व सीमा सुरेश डोंगरे (रा. डीपी रोड, शिक्षक कॉलनी, बीड) यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. खासगी दवाखान्यात परिचारिकेचे काम करणाऱ्या सीमा डोंगरेने ८ जून रोजी पाली (ता. बीड) तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. उर्वरित पाच आरोपी १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, तपासात मृत सीताबाई गाडे हिचे लिंगनिदान मनीषा सानप हिच्या गेवराईतील बंगल्यात २ जून रोजी झाले होते, असे समोर आले. मनीषा सानपच्या प्राथमिक चौकशीत सतीश बाळू सोनवणे (२५, रा. जाधववाडी, जि. औरंगाबाद) या शिकाऊ डॉक्टरचे नाव पुढे आले. त्यानंतर अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, जालना तसेच स्थानिक पातळीवरही पोलिसांची पथके तपास करत होती. अखेर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, हवालदार रामदास तांदळे, मनोज वाघ, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, विकास वाघमारे, अशोक कदम यांच्या पथकाने सतीश सोनवणे यास अहमदनगर येथील एका नामांकित हॉटेलातून ताब्यात घेतले.

पैशाच्या आमिषापायी करिअर बरबाद
सतीश सोनवणे याचे आई-वडील शेती करतात. तो तमिळनाडू येथील डॉ. एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेतो. दोन वर्षांपूर्वी द्वितीय वर्षात तो अनुत्तीर्ण झाला होता. मात्र, नंतर परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला. अंतिम परीक्षा देऊन गावी आल्यावर मागील चार महिन्यांपासून तो मनीषा सानपच्या मदतीने गर्भलिंगनिदान करायचा. एका लिंगनिदानाचे त्यास दहा हजार रुपये मिळत असे. पैशाच्या आमिषाने त्याचे करिअर बरबाद झाले आहे.

गर्भलिंगनिदानाचे जालना कनेक्शन
जालना येथे १ मे २०२२ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी चंदनझिरा पोलिसांच्या साहाय्याने डॉ. सतीश गवारे याच्या रुग्णालयात सापळा रचून छापा टाकला. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा नोंद झाला होता. अंगणवाडी सेविका मनीषा सानप व डॉ. सतीश गवारे यांची ओळख होती. त्यावरून डॉ. गवारे मनीषा सानपकडे गर्भलिंगनिदानासाठी येत होता का, या दृष्टीनेही तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे डॉ. गवारेकडे सहायक म्हणून काम करायचा. तेथेच मनीषा सानप व सतीश सोनवणेची ओळख झाली होती. अवैध गर्भलिंगनिदानाचे जालना कनेक्शन समोर आले आहे.

एकावेळी चार ते पाच गर्भवतींचे लिंगनिदान
मनीषा सानप गर्भलिंगनिदानासाठी गर्भवतींना हेरायची. तिच्याकडून ३५ हजार रुपये घ्यायची. एकावेळी चार ते पाच गर्भवतींची नोंदणी करून गेवराईतील बंगल्यात यायला सांगायची. त्यानंतर सतीश सोनवणे यास पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह बोलवायची. गर्भलिंगनिदानासाठी स्वतंत्र खोली होती. खोलीत नातेवाइकांना प्रवेश नसायचा. केवळ गर्भवती महिला ते देखील तोंडाला स्कार्फ बांधून पाठवायची. पोटावर यंत्रणा फिरवून सतीश सोनवणे हा लिंगनिदान करायचा. मुलगा असेल तर पी (पॉझिटिव्ह) व मुलगी असेल तर एन (निगेटिव्ह) असा कोडवर्ड तो वापरत असे. चार महिन्यांत तो २८ वेळा येऊन गेल्याचे तांत्रिक पुरावेदेखील हाती लागले असून, दीडशेवर महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचा अंदाज आहे. लिंगनिदानासाठी शक्यतो शनिवार निवडला जात असे.

मनीषा सानपच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयाला पत्र
दरम्यान, अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिच्या घरी २९ लाखांची रोकड आढळली होती. त्यावरून मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला होता. मात्र, तिला न्यायालयीन कोठडी मागितल्याने पोलिसांच्या तपासावर साशंकता निर्माण झाली होती. शिवाय मुख्य सूत्रधाराच्या अटकेलाही विलंब लागला होता. तिच्या अटकेसाठी पिंपळनेर पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली असून, पोलीस कोठडी घेऊन सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले. हा सामाजिक गुन्हा असून, तो संवेदनशीलपणे हाताळला जात आहे. तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगून तपास अधिकारी बदलण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने सुरुवातीपासूनच संवेदनशीलपणे न्यायाची बाजू लावून धरली होती. वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा म्हणून कोवळ्या कळ्या जन्माला येण्याआधीच खुडणाऱ्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार अंगणवाडी सेविका मनीषा सानप व शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे यांची अटक महत्त्वाची होती. पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू होता. लोकमतने कायमच पाठपुरावा केल्याने अखेर शिकाऊ डॉक्टर तावडीत सापडला, तर मनीषा सानपच्या अटकेच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

Web Title: 'Boy P, Girl N'; Market filled for gender diagnosis by Anganwadi worker with trainee doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.