बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:48+5:302021-03-20T04:32:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास अटकाव केला. कोणतीही तक्रार नसतानाही सेवा सोसायटीतील अर्ज फेटाळले. औरंगाबाद व इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला दिला नाही. आम्ही विरोधकांपेक्षा कितीतरी पटीने वरचढ होतो, म्हणूनच पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी रडीचा डाव खेळत प्रशासकांच्या माध्यमातून बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी १९ मार्च रोजी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, अक्षय मुंदडा, सुभाषचंद्र सारडा, अशोक लोढा, विजयकांत मुंडे उपस्थित होते.
बीड जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणण्याचा डाव पालकमंत्री खेळत आहेत. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कोणाचेही आक्षेप नसताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःहून उपविधी क्र. उदा. (अ) (५) याला निकाल लागेपर्यंत स्थगिती असतानाही ही स्थगिती सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी प्रक्रियेतील प्रकरणाचा हवाला देऊन ‘स्थगितीची काल मर्यादा’ या नावाखाली ७५ टक्के उमेदवारी अर्ज नामंजूर केले. त्यामुळे बँकेच्या १९पैकी ८ जागांसाठी निवडणूक लागली. दरम्यान, निवडून येणाऱ्या आठ संचालकांमुळे गणपूर्तीची अट पूर्ण होत नसल्यामुळे या निवडणुकीला काही अर्थ उरलेला नाही, म्हणूनच आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
बँकेला कर्जात बुडविणारेच असे कारस्थान करून बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही बँक ताब्यात घेतली तेव्हा २५० कोटींचे कर्ज बँकेवर होते. ते फेडून आम्ही एक हजार कोटींचे भागभांडवल वाढवले. कारण ही बँक चांगली चालली पाहिजे कारण ती शेतकऱ्यांची बँक आहे, अशी आमची भूमिका होती, असेही मुंडे म्हणाल्या.