रस्त्यावरच्या फांद्या ठरत आहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:41+5:302021-04-16T04:33:41+5:30
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या ...
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू आदनाक यांनी केली आहे.
कृषी विभागाच्या बंधाऱ्याची दुर्दशा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. आता हे बंधारे झालेल्या मोठ्या पावसामुळे नादुरूस्त झाले आहेत. अनेक बंधाऱ्यांना मोठमोठ्या भेगा पडल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे हे बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. या बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.
मंदिर परिसरात शुकशुकाट
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावली आहे. आता पुन्हा मंदिर बंद ठेवल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंदिर बंद असल्याने या परिसरातील व्यवसायही थंडावले आहेत.
बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.
सुट्ट्या पैशांचा तुटवडा
अंबाजोगाई : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात चिल्लरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना इतरत्र भटकावे लागत आहे. दहा रुपयाचा रोकडा चलनात असतानाही व्यापारी व दुकानदार तो रोकडा स्वीकारत नसल्याने ग्रामस्थांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.