भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:32 PM2020-04-18T12:32:23+5:302020-04-18T12:40:43+5:30
आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई - ‘चोरी केली की देव पाप देतो’ ही प्रचलित असलेली म्हण मात्र अंबाजोगाईकरांसाठी खोटीच ठरली. जिथे देवच सुरक्षित राहिला नाही. तिथे माणसांचं काय? असा प्रश्न श्री योेगेश्वरी देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी, यातील निर्दोष सुटलेले आरोपी यावरून निर्माण झाला आहे.
आठ वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१२ च्या पहाटे चोरट्यांनी श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेले. दिवेआगार व अंबाजोगाई येथील झालेल्या या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठे काहूर माजले होते. चोरीचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डी. वाय मंडलिक यांनी स्वत:कडे घेतला होता. दागिने चोरणारे चोर पकडून आणावेत या मागणीसाठी अंबाजोगाईत बंद, मोर्चे, आंदोलने अशा विविध मार्गांनी भाविकांनी रोष व्यक्त केला होता. दागिन्यांविना देवी पाहणे भाविकांना न रुचल्याने चोरी गेलेल्या दागिन्यांपेक्षा तिप्पट दागिने भक्तांनी देवीला अर्पण केले. भाविकांची सोनेरी श्रद्धा देवीला भरभरून देऊन गेली. कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही चोरांचा तपास लावा, ही मागणी पुढे करीत देवीच्या दागिन्यांसाठी स्वत: हातात परडी घेऊन मदत फेरी अंबाजोगाई शहरातून काढली होती. एक सच्चा भक्त म्हणून मुंडेंनी तीन लक्ष रुपये परडीत जमा केले व उर्वरित रक्कम स्वत:ची घालून देवीला दागिने अर्पण केले.
देवीच्या दागिन्यांची झालेली चोरी व केज विधानसभेची पोटनिवडणूक या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्याने दागिन्यांच्या चोरीला राजकीय भांडवल म्हणून त्यावेळीच्या निवडणुकीत पाहिले गेले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. तत्कालिन मंत्री सुरेश धस, धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ देवीला दागिने अर्पण केले. निवडणुकीच्या प्रचारात चोरीचा तपास हा कळीचा मुद्दा बनला होता. अंबाजोगाई व दिवेआगार येथील झालेली चोरी , दोन्ही चोरीतील आरोपी एकच असावेत असा कयास पोलिस प्रशासनाने बांधला व सलग दोन महिले विविध ठिकाणच्या आरोपींना चौकशीसाठी बोलावून धाडसत्र सुरूच राहिले.
प्रशासनाचा दट्ट्या पोलिसांवर राहिल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशा अनेक घटना या कालवाधीत घडल्या. मात्र खरे चोर कोण? हा प्रश्न अजूनही निर्दोष सुटलेल्या आरोपींमुळे गुलदस्त्यातच राहिला आहे.
दागिन्यांच्या चोरी प्रकरणातील पोलिसांनी पकडलेले आरोपी हे खरे आरोपी नाहीत याबाबत लोकमतने आवाज उठविला होता. अन् ती शंका न्यायालयाच्या निकालानंतर खरी ठरली. तब्बल एक वर्षे पोलिस तपास झाला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या भक्तांना चोरांना शिक्षांना व्हावी व दागिने परत मिळावेत अशी अपेक्षा बाळगून होते. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली. चोरीची घटना होऊन आठ वर्षाचा कालावधी लोटला तरीही पोलिस प्रशासनाला आजही आठ वर्षा नंतर या बाबतीत यश आले नाही. ही रुखरुख भाविकांच्या मनाला कायम बोचरी ठरणारी आहे.