दुष्काळी परिस्थितीमुळे वृक्ष लागवड संगोपन योजनेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:21 AM2018-12-09T00:21:11+5:302018-12-09T00:21:24+5:30
वृक्ष लागवड संगोपन योजना जून २०१९ पर्यंत स्थगित करण्याचे पत्र सीईओंनी सर्व पंचायत समितींना दिले आहे
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागणार आहे. त्यामुळे रोहयोंतर्गंत पंचायत समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणारी वृक्ष लागवड संगोपन योजना जून २०१९ पर्यंत स्थगित करण्याचे पत्र सीईओंनी सर्व पंचायत समितींना दिले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड संगोपन योजनेला ब्रेक लागणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात पर्जन्य व पाणीटंचाई स्थिती गंभीर आहे. १५ जून ते ३१ आॅगस्ट हा कार्यकाळ वृक्ष लागवडीसाठी योग्य आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईचा विचार करता वृक्ष लागगवड व संगोपन योजना राबवणे शक्य नाही. त्यामुळे नवीन कामे सुरु करु नयेत असे पत्र जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीला दिले आहेत. तसेच नवीन कामे सुरु करुन वृक्ष लागवड संगोपन कामावर खर्च झाला.हा खर्च वाया गेला तर संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, डाटा एंट्री आॅपरेटर, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगारसेवक यांची जबाबदारी राहणार आहे. तसेच आदेश डावलून योजना राबवली व खर्च वाया गेला तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
जुन्या कामांची देखील होणार पाहणी
योजनेंतर्गत सुरु असलेल्य जुन्या वृक्षसंगोपनाच्या कामाची देखील पथक नेमून पाहणी करण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. तसेच सुरु असलेल्या योजनेमध्ये किती वृक्ष जगले व मृत पावले याचे जिओ टॅग फोटोसह काम निहाय अहवाल ७ दिवसात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, काही ठराविक ठिकाणची कामे पाहून कारवाई केल्याचे भासवले जाते व बाकी बोगस कामे सुरुच ठेवली जातात असा प्रकार बीड पंचायत समितीच्या माध्यमातून झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे इतर विभागातील अधिकाऱ्यांचे पथक सीईओंनी नेमावे व कामांचा खरा अहवाल तयार करावा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी मागणी देखील नागिराकंमधून होत आहे.