वायर तोडून गावचा पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:42+5:302021-05-10T04:33:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया मेहेकरी तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. परंतु येथील विद्युत पंपाच्या वीजपुरवठ्याची वायर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया मेहेकरी तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. परंतु येथील विद्युत पंपाच्या वीजपुरवठ्याची वायर काही विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक तोडण्यात येत आहे. त्यामुळे टाकळी गावाला पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. अज्ञात व्यक्तीकडून केला जाणारा खोडसाळपणा थांबविण्यात यावा, अशी मागणी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी अंभोरा पोलिसांकडे निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया गावच्या सरपंच निशा ससाणे, उपसरपंच विष्णू निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भुकन, ग्रामसेविका विद्या नाईक यांनी याबाबत अंभोरा पोलिसांत तक्रार दिली आहे. टाकळी अमिया गावाला मेहेकरी तलावात घेतलेल्या विहिरीतून नळयोजनेव्दारे पाणीपुरवठा केला जातो. सरपंचपदी निवड झाल्यानंतर निशा ससाणे यांनी स्वखर्चाने ५ लाख रुपये खर्च करून जुनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. त्यामुळे तीन चार वर्षांपूर्वी पडलेल्या भयंकर दुष्काळातदेखील टाकळी अमिया गाव टँकरमुक्त होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मेहेकरी तलावातील विहिरीतील विद्युत पंपाची केबल काही अज्ञात लोकांकडून जाणीवपूर्वक व वारंवार तोडण्यात येत आहे. त्यामुळे गावाला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात अडचण येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी अंभोरा पोलिसांनी वारंवार केबल तोडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीव्दारे केली आहे.