नाश्ता येतो ११ वाजता अन् दुपारचे जेवण ३ वाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:26+5:302021-05-10T04:34:26+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर जेवण आणि नाश्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. सकाळचा ...
बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर जेवण आणि नाश्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. सकाळचा नाश्ता ११ वाजता आणि दुपारचे जेवण ३ वाजता येत आहे.रात्रीच्या जेवणालाही ११ वाजत असल्याच्या तक्रारी आहेत. जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सामान्य वैतागले असून कोरोनाबाधितांची उपासमार होत आहे.
जिल्हा रुग्णालयासह परिसरातील इमारतीत जवळपास ७५० रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आयटीआयमधील कोविड सेंटरमध्येही ५० रुग्ण उपचार घेतात. या सर्वांना सकाळी चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व पदार्थ पुरविण्याचे कंत्राट खासगी व्यक्तीला दिलेले आहे. सुरुवातीला काही दिवस कंत्राटदाराकडून वेळेवर आणि चविष्ट जेवण पुरविण्यात आले; परंतु आता वेळेवर जेवण देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सकाळचा चहा, नाश्ता वेळेवर जात नाहीत. तसेच जेवणही उशिरा जात असल्याने बाधित असलेल्या रुग्णांची उपासमार होत आहे. जेवण नसल्याने औषधी घेण्यासह उशीर होत आहे. याचा फटका आरोग्यावर होत आहे. वेळेवर जेवण व औषधी न मिळाल्यास हे रुग्ण कोरोनामुक्त कसे होतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाधितांची उपासमार होणार नाही, त्यांना वेळेवर सर्व पदार्थ व जेवण पोहोचविण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रुग्णांनी केलेल्या तक्रारींचा विचार करण्यासह अचानक तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णांचे हाल
जेवण पुरविणारे कंत्राटदार हे गेटवर आणून डब्बे ठेवतात आणि निघून जातात. येथील वॉर्डबॉय देखील प्रत्येक रुग्णाला जेवण पोहोचवित नाहीत. केवळ एकदा आवाज देऊन बसतात; परंतु ज्या रुग्णाना ऑक्सिजन लावलेले आहे, वृद्ध असल्याने चालता येत नाही, अशांना याचा त्रास होत आहे. वॉर्डबॉयलाच खाटावर जेवण पोहोचविण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणीही होत आहे. जे देणार नाहीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रुपवर मेसेज टाकूनही दुर्लक्षच
ज्या वॉर्डमध्ये जेवण, नाश्ता अथवा इतर आवश्यक पदार्थ येत नाहीत, त्या वॉर्डमधील परिचारिका तत्काळ सोशल मीडियावरील ग्रुपवर मेसेज टाकून माहिती देतात, परंतु तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तर काही परिचारिकाही १०.३० पर्यंत नाश्ता आला नाही तरी मेसेज करत नाहीत. आम्ही वाट पाहतोत, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे.
...
पोळ्या करण्यासाठी महिला मजूर कमी होत्या. त्यामुळे उशीर झाला. यापुढे वेळेवर सर्व जेवण पाठविले जाईल.
-अब्दुल गणी, कंत्राटदार, बीड.
...
जेवण आणि नाश्ता वेळेवर मिळत नसेल तर संबंधिताला बोलावून घेत सूचना करतो. यापुढे असे होणार नाही.
-डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.