आडसमध्ये साते दुकाने फोडली; रोख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:53 AM2018-08-15T00:53:20+5:302018-08-15T00:53:46+5:30
केज : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने व एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी सर्व दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरीची ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर चोरीच्या घटना घडल्या असल्याने व्यापारी वर्गातून असंतोष व्यक्त होत आहे.
आडस येथे शिवाजी महाराज चौकात अंबाजोगाई रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील संध्या कलेक्शन, आडकेश्वर ट्रेडर्स, आमले हार्डवेयर, ओमसाई कृषी सेवा केंद्र, सतीश अॅग्रो एजन्सी, राधिका टेक्सस्टाईल व माऊली पान सेंटर या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील तिजोरीतून रोख रक्कम मंगळवारी चोरी करून अज्ञात चोरटे पसार झाले आहेत.
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये सदरील चोरटे कैद झाले आहेत. मिळालेल्या फुटेजवरून तीन चोरटे असल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना माहिती मिळताच त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकास सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आडस येथे रवाना केले आहे. चोरीच्या घटना या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्या असल्याने स्थानिक पोलीस रात्री कोणीच सेवेवर कार्यरत नसल्याने या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल व्यापारी वर्गातून असंतोष व्यक्त केला
या घटनेसंबंधी परमेश्वर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत रोख २९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे.