वाहन चालविताना नियम तोडला, दंड कधी भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:26+5:302021-07-09T04:22:26+5:30
बीड : नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. परंतु, ई-चलान फाडले जात असल्याने अनेकांना आपल्याला दंड झाल्याची ...
बीड : नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. परंतु, ई-चलान फाडले जात असल्याने अनेकांना आपल्याला दंड झाल्याची भनकही लागत नाही. त्यामुळे जवळपास ४० टक्के वाहनधारकांकडे लाखो रुपयांचा दंड थकीत असून, त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते.
बीड शहरात वाहतूक शाखा वेगवेगळ्या मोहिमा राबवून दुचाकी, ऑटोचालक व कारचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी वाहनधारकाने नियम अथवा सिग्नल तोडला तर तो पळून जात असे. त्यानंतर अनेक वेळा पोलिसांनी पाठलाग करून अशा वाहनचालकांवर कारवाई केलेली आहे. परंतु, ई-चलानमुळे पोलिसांना आता वाहनांमागे पळण्याची गरज राहिलेली नाही. मोबाइलध्ये एक फोटो काढून एका क्लिकवर दंड ठोठावता येतो. अशांना दंड भरण्यासंदर्भात नोटीस गेल्यानंतर आपण नियम मोडल्याचे लक्षात येते. तसेच दंड भरला नाही तर कारवाईदेखील होते.
२०२१ मधील आकडेवारी काय सांगते?
७५,६०० जणांनी मोडला नियम
५०,३०० जणांनी भरला दंड
२५,३०० जणांनी भरला नाही दंड
१ कोटी ८५ लाख ५० हजार एकूण दंडाची रक्कम
१ कोटी १३ लाख दंड भरला
७२ लाख रुपये थकीत दंड
२०२१ मध्ये झालेली कारवाई
विनाहेल्मेट - १४९४
विनासीटबेल्ट - १११६५
मोबाइलवर बोलणे २८०८
नो-पार्किंग - २६९८
ट्रिपल सीट -१६९८
विनापरवाना १२८०
नंबर प्लेट - ९०
कर्णकर्कश हॉर्न- ५५
इशारा करून न थांबणे २३५००
दंड होतो कोणत्या ठिकाणी वसूल
विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे ऑनलाइन दंड आकारणी झाल्यानंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी वाहनाची तपासणी केली असता, तो दंड भरून घेतला जातो.
ऑनलाइन दंडामुळे अनेक जण वाहतूक नियमांचे पालन करत आहेत. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस कायम बंदोबस्तावर तैनात केलेले असतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक करावाई दोन्ही पद्धतीने केली जाते.
ज्या वाहनचालकांवर नियम मोडल्यामुळे ऑनलाइन दंड ठोठावला आहे त्यांना वेळोवेळी नोटीस देऊन दंड भरण्यासंदर्भात अवगत केले जात आहे. दरम्यान, तरीदेखील दंडाची रक्कम वेळेत भरली नाही, तर कायदेशीर पुढील कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.
- कैलास भारती (स.पो.नि.) वाहतूक शाखाप्रमुख, बीड