‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:19 AM2019-06-19T00:19:07+5:302019-06-19T00:19:39+5:30
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापैकी फक्त अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातच या तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. या तपासणीचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.
येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली अत्यंत आत्याधुनिक सुविधा असलेली थ्री डी मॅमोग्राफी तपासणीची सुविधा १५ जूनपासून सुरु करण्यात आली आहे.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात बसवण्यात आलेली ही मॅमोग्राफी मशीन १ कोटी ५० लाख रुपये किंमतीची असून स्तनाच्या कॅन्सरचे अचूक निदान करणारी मशीन आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या आवश्यक त्या सर्व रुग्णांच्या योग्य निदानासाठी या तपासणी सुविधेचा लाभ रुग्णांना मिळवून द्यावा व अचूक निदान करुन योग्य तो वैद्यकीय उपचार करावा अशा सूचना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरण, मेडिसिन, सर्जरी, ओबीसीटी, गायनिक आणि इतर विभागाचे प्रमुख, पदव्युत्तर विद्दार्थी तसेच वैद्यकीय महाविद्यालय समितीचे सदस्य डॉ.पी.एस. पवार वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रतिबंधक समितीचे सदस्य सुदर्शन रापतवार, सुरक्षा समितीचे सदस्य रमाकांत पाटील, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राकेश जाधव, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. दीपक लामतुरे, मेट्रन उषा भताने, क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. सर्वेश पाटील, राहुल बुजाडे, डॉ. प्रतीक गायकवाड, डॉ. शालिनी, डॉ. प्रतीक उमरीकर, गायनिक विभागाचे डॉ.गणेश तोंडगे, मेडिसीन चे डॉ.उदय जोशी, क्ष-किरण विभागातील कर्मचारी परिचारिका व इतर अनेक मान्यवर उपस्थित
होते.