'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:28 PM2022-12-08T19:28:54+5:302022-12-08T19:29:31+5:30

नवरीस मैत्रिणीसोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडले

bribe trying to escape next day of marriage, Fake marriage gang exposed in Beed | 'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

बीड :लग्नाळू तरुणाला खासगी एजंटाने स्थळ आणले. पसंती झाल्यावर मुलीच्या आईला नवरदेवाने अडीच लाख देण्याची तयारी दर्शवली. ५ डिसेंबरच्या मुहूर्तावर वसमत (जि. परभणी) येथे नोटरी करून करारपत्रक करून विवाह लावला; परंतु दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री नवरीने मला इथे राहयचे नाही, अशी टूम लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मैत्रिणीच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण नवरदेवाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यातून बनावट लग्न लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

त्याचे झाले असे, आष्टी तालुक्यातील वैभव (नाव बदललेले) हा बीडमध्ये सायकल मार्ट चालवून उदरनिर्वाह भागवतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही लग्न होत नसल्याने तो बेचैन होता. बीडमध्ये बहिणीच्या घरी तो राहतो. बहीण व मेहुण्याने त्याच्यासाठी वधूशोध सुरू केला तेव्हा त्यांना एजंट नाना पाटील नुरसारे याच्याकडे भरपूर स्थळ असल्याची माहिती कळाली. त्यामुळे दोघांनी त्याच्याशी संपर्क केला. ३ डिसेंबरला बहिणीच्या घरी बैठक झाली, त्यात नाना पाटील नुरसारे याने वैभवला दुर्गा बालाजी माने या तरुणीचा फोटो दाखवला. फोटोत वैभवने तिला पसंत केल्यावर नाना पाटील नुरसारे याने ती हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील सिद्धार्थनगरातील रहिवासी असून, तिला वडील नसल्याचे सांगितले. लग्नासाठी अडीच लाख रुपये मुलीच्या आईला द्यावे लागतील, अशी अट नुरसारे याने घातली. दोन दिवसांत पैशांची तजवीज करून ५ डिसेंबरला मुहूर्त ठरला. परभणी जिल्ह्यातील वसमत येथे करण्याचे निश्चित झाले. वसमत येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर दुर्गा माने हिचा वैभवशी विवाह करारनामा केला. पुष्पहार व मणी मंगळसूत्र घालून विवाह लावल्यानंतर दुर्गाला घेऊन वैभव मोठ्या हौसेने बीडला पोहोचला. त्याआधी अडीच लाख रुपयेदेखील दिले.

मरेन नाही तर मारीन...
दरम्यान, ६ रोजी मध्यरात्री नवरी बनून आलेल्या दुर्गाने वैभवची बहीण व मेहुण्यास मला इथे राहायचे नाही, असे सांगितले. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तुम्हाला मारीन, नाही तर जीवाचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकी तिने दिली. त्यानंतर रात्रभर सर्वजण जागेच राहिले.

दुर्गाला घेऊन जायला आली अन् अडकली...
दुसऱ्या दिवशी सकाळी मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव) ही बीडला पोहोचली. तिने वैभवच्या मेहुण्यास फोन करून आपण दुर्गाला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले असून, बसस्थानकात तिला घेऊन या, असे सांगितले. मेहुण्याने नकार दिल्यावर घर शोधत ती दुर्गाजवळ पोहोचली. पसार होण्याच्या तयारीत असतानाच दुर्गासह मीनाला वैभवने पकडले. सकाळी १० वाजताच तो त्या दोघींना घेऊन शहर ठाण्यात पोहोचला. वैभवच्या फिर्यादीवरून मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव), दुर्गा बालाजी माने (१८, रा. मानवत, जि. परभणी), नाना पाटील नुरसारे, बालाजी भालेकर, मनकर्णा माने, आकाश माने (सर्व रा. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), विनोद खिल्लारे (रा. हिंगोली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

तीन दिवसांची पोलिस कोठडी
बनावट नवरी बनून आलेली दुर्गा माने हिंगोलीची नव्हे तर माजलगाव तालुक्यातील निघाली. तिच्यासह मैत्रीण मीना बागल या दोघींना पोलिस निरीक्षक रवी सानप, सहायक निरीक्षक घनशाम अंतरप, हवालदार मीरा रेडेकर, पोना. ज्योती कांबळे, अश्विनी दगडखैर, अंमलदार दीपाली ठोंबरे, अविनाश सानप यांनी ताब्यात घेतले. त्यांना ७ रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास उपनिरीक्षक बिभीषण जाधव करत आहेत.

या टोळीने बनावट लग्न लावून पैसे उकळत अनेकांना फसविलेले असू शकते. एकूण सात जणांवर गुन्हा नोंदविला असून, दोघी ताब्यात आहेत. पाच आरोपींचा शोध सुरू आहे.
- रवी सानप, पोलिस निरीक्षक बीड शहर

Web Title: bribe trying to escape next day of marriage, Fake marriage gang exposed in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.