लाच प्रकरण; हवालदाराला कोठडीबाहेर ठेवून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:48 AM2019-01-08T00:48:27+5:302019-01-08T00:48:46+5:30
लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लाच प्रकरणात अटक केलेल्या पोलीस हवालदाराला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. नियमानुसार कोठडीबाहेर आरोपीवर उपचार करणे धोक्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे एक आरोपी कोठडीत तर दुसरा बाहेर असा प्रकार समोर आला. या निमित्ताने बीड पोलिसांचा दुजाभाव चव्हाट्यावर आला आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार शंकर राठोड यांना १० हजार रुपयांची लाच घेताना दोन दिवसांपूर्वी जालना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले होते. रविवारी राठोड यांच्या छातीत दुखू लागल्याने सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही ठेवण्यात आला. मात्र, राठोड यांना कोठडीत ठेवून उपचार करण्याऐवजी संबंधित पोलिसाने बाहेर काढले. हा प्रकार माध्यमांनी समोर आणल्यानंतर आरोग्य व पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.
बीड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार म्हणाले, कोठडीबाहेर उपचार करता येत नाहीत. येथील सुरक्षारक्षकाची ही जबाबदारी आहे. गैरप्रकार घडल्यास अंगलट येऊ शकते. याची माहिती घेतली जाईल.
एक आरोपी कोठडीत, दुसऱ्याला बाहेर का?
एरव्ही आरोपीला भेटू न देणारे पोलीस या प्रकरणात मात्र शिथील झाल्याचे दिसले. एका आरोपीवर कोठडीत उपचार केले जात होते तर दुस-याला बाहेर.
आरोपी हा आरोपीच असतो. मात्र पोलिसांनी येथे दुजाभाव केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. आता यावर कारवाई होते की, हे प्रकरण पोलीस असल्याने पुन्हा दडपले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
वॉर्डमध्ये काय चालते, हे प्रमुखांना माहिती असणे आवश्यक आहे. प्रमुख डॉ. बाळासाहेब टाक यांना विचारले असता ते म्हणाले, बाहेर ठेवून उपचार करण्यात इतपत त्यांची प्रकृती गंभीर नव्हती. मी उपचार केले तेव्हा आरोपी बाहेरच होता. अॅडमिट झाल्यापासून तो कोठे आहे, याबाबत मला माहिती नाही. विचारून सांगतो, असे ते म्हणाले. मात्र उशिरापर्यंत त्यांनी कसलीच माहिती दिली नाही. यावरून डॉ. टाक हे सुद्धा संशयाच्या भोवºयात अडकले आहेत. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घालणे गरजेचे होते, मात्र त्यांनी हे लपवल्याचे बोलले जात आहे.