वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त, चोरट्याने लांबविली दागिन्यांची बॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:46 PM2023-02-17T12:46:19+5:302023-02-17T12:47:26+5:30

याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

bribes mother busy talking to relatives, furtively held out a bag of jewels | वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त, चोरट्याने लांबविली दागिन्यांची बॅग

वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त, चोरट्याने लांबविली दागिन्यांची बॅग

Next

बीड : लग्नसोहळ्यात दागिने लंपास होण्याचे सत्र सुरूच आहे. बीडसह माजलगावातील घटना ताजी असतानाच १२ फेब्रुवारीला शहरातील शिंदेनगरजवळील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयातून दागिने लंपास झाल्याचे समोर आले. वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवली. याबाबत १५ फेब्रुवारीला शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नाेंद झाला.

माया भास्कर सोनवणे-चोपडे (रा. पिंपरगव्हाण रोड, बीड) या शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा स्वप्नील याचा १२ रोजी शहरातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह पार पडला. माया सोनवणे या लग्नानंतर नातेवाइकांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी जवळील बॅग खुर्चीवर ठेवली. त्या नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने नेकलेस, मिनी गंठण, पँडल असे दागिने व रोख १० हजार रुपये, एक मोबाइल असलेली बॅग लंपास केली. एकूण २ लाख ५४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तपास करीत आहेत.

यापूर्वी दोन घटना
बीड शहरातील धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयातून २६ जानेवारीला लग्नसमारंभातून दहा तोळे दागिने व ९० हजार रुपये रोख असा पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल असलेली वरमाईची बॅग एका अल्पवयीन मुलीने लंपास केल्याची घटना घडली होती. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे १० फेब्रुवारीला मंगल कार्यालयातून नवरीचे चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने लांबविले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच बीडला तिसरी घटना घडली.

Web Title: bribes mother busy talking to relatives, furtively held out a bag of jewels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.