वीटभट्टी कामगार महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:14+5:302021-03-31T04:34:14+5:30
माजलगाव : एक महिन्यापूर्वी नांदेडहून माजलगाव धरणाशेजारी चालत असलेल्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या ...
माजलगाव : एक महिन्यापूर्वी नांदेडहून माजलगाव धरणाशेजारी चालत असलेल्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मयत महिलेचा पती, सासू, सासरा, नणंद व नंदावा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चौकीधर्मापुरी येथील रहिवासी असलेले राजेश गोविंद कळकेकर व त्याची पत्नी मनकर्णा राजेश कळकेकर हे त्यांच्या आई-वडिलांसोबत जमत नसल्याने, एक महिन्यापूर्वी केसापुरी शिवारातील व माजलगाव धरणाशेजारी असलेल्या पवार वीटभट्टीवर काम करण्यासाठी आले होते. एक महिना त्यांनी या ठिकाणी चांगले काम केले.
मनकर्णा हिला तिचे सासू-सासरे, पती, नणंद व नंदावा हे मागील अनेक वर्षांपासून माहेरावरून तू पैसे आण, म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या जाचाला कंटाळून मनकर्णा हिने सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या कच्च्या विटांच्या घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, पत्नीने आत्महत्या केल्याचे माहीत होताच, पतीने तिला खाली उतरवून तिला साप चावल्याचा बनाव केला. त्यानंतर, साप शोधण्यासाठी येथे असलेल्या नागरिकांनी आजूबाजूच्या विटा व पसारा काढला. मात्र, त्या ठिकाणी साप काही सापडला नाही. मनकर्णाचा पती राजेश याने यानंतर शहर पोलिसात जाऊन पत्नीने आत्महत्या केल्याची खबर दिली.
मनकर्णाने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनात आढळून आल्यानंतर, तिच्या पतीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. मंगळवारी सकाळी राजेशची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. तो पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर, त्यास ऑनलाइन न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मनकर्णाचे वडील ज्ञानोबा वानखेडे (रा.बेटसावंगी ता.लोहा जि.नांदेड) यांच्या फिर्यादीवरून तिचा पती राजेश, सासरे गोविंद कळकेकर, सासू वत्सलाबाई कळकेकर, ननंद प्रियांका पवार व नंदावा सुभाष पवार यांच्या विरुद्ध माजलगाव शहर पोलिसात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.