बीडमध्ये बालविवाह रोखताना वधूमातेची आत्महत्येची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:58 AM2022-11-29T11:58:02+5:302022-11-29T11:58:23+5:30
पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या.
बीड : शहरातील काळे गल्ली भागात बालविवाह रोखण्यास गेलेल्या पोलिसांना वधूमातेने आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे पोलिस हैराण झाले. अखेर तिला समजावत नियोजित विवाह रोखण्यात आला. २८ नोव्हेंबरला दुपारी हा प्रकार घडला.
बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना शहरातील काळे गल्लीत १७ वर्षीय मुलीचा हिवरसिंगा (ता. शिरूर) येथील तरुणाशी विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून २८ रोजी ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक निरीक्षक महादेव ढाकणे यांनी चार अंमलदार सोबत दिले. त्यानंतर तत्त्वशील कांबळे व पोलिस अंमलदार काळे गल्लीत पोहोचले. तेथे पोलिस येणार असल्याची कुणकुण लागताच सामानाची आवराआवर करून वधू-वरांना पांगविण्यात आले. पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या. त्यामुळे हा विवाहच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केल्यावर वधूमातेने गोंधळ घालत थेट आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर तिला पोलिस व नातेवाइकांनी समजावले. वधूसह मातेला बीड शहर पोलिस ठाण्यात नेऊन समुपदेशन केले. त्यानंतर अल्पवयीन वधूला बालकल्याण समितीपुढे हजर केले. समितीने मुलीला स्वाधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
ठाण्यात बोलावून समजावले
बालविवाह होणार असल्याच्या माहितीवरून अंमलदार पाठवले होते. मुलीच्या आईने गोंधळ घातला; पण नंतर ठाण्यात बोलावून समजावले. शासकीय कामकाजात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होऊ शकतो, असे समजावल्यावर त्या शांत झाल्या.
- महादेव ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक, बीड शहर ठाणे