वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:46 IST2023-06-11T12:45:16+5:302023-06-11T12:46:43+5:30
दोघांच्याही पालकांसह नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल

वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत
बीड : वाशिम जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला अंबाजोगाईत आणून परळी तालुक्यातील मुलाने विवाह केला. ही बाब समजताच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व पंचनामा करण्यात आला. यात बालविवाह झाल्याची खात्री पटताच दोघांच्याही पालकांसह भंतीजी व इतर नातेवाइकांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भीमराव इंगोले (रा. उकळीपेन, ता. जि. वाशिम) यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह परळी तालुक्यातील मोहा येथील गौतम तातेराव शिंदे याच्यासोबत होता. ९ जूनला सकाळी ११:२० चा मुहूर्त असतानाच काही लोकांनी बालविकास कार्यालयाला याची माहिती दिली. त्यानंतर येथील सर्व कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबाजोगाई शहरातील परळी वेस भागात हा विवाह झाल्याची खात्री पटताच मुलीचे वडील, मुलाचे वडील, आजोबा, आदी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.