नवरीचा मामा म्हणून मिरवला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:08 PM2020-07-08T19:08:24+5:302020-07-08T19:15:05+5:30
गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीड : आष्टी तालुक्यातील कारखेल येथे विनापरवानगी आणि ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमवून विवाह लावल्याप्रकरणी वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळींवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २९ जून रोजी झालेल्या या विवाहाची माहिती ५ जुलै रोजी प्रशासनाला समजली. यावरून प्रशासन किती गाफिल आहे, याची प्रचिती येते. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना हा प्रकार समोर आला आणि प्रशासन खडबडून जागे झाले.
पनवेल येथून एक जण कारखेल येथे आला होता. आल्यानंतर त्याने क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. परंतु तो अहमदनगरला गेला. नंतर कारखेल येथीलच आपल्या भाचीच्या लग्नात उपस्थित राहिला. नंतर तो दोन दिवसांनी पॉझिटिव्ह आला. नवरीचा मामा असल्याने तो सर्वत्र मिरवल्याने अनेकांशी त्याचा संपर्क आला. हा विवाह देखील विनापरवानगी लावल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे वधूपित्यासह मामा व इतर वºहाडी मंडळीवर ग्रामसेवक अशोक खाकाळ यांच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गावात दक्षता समिती असूनही हा प्रकार घडल्याने समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारावरून ग्रामसेवकांचेही गावात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
मामावर होम क्वारंटाईन नियम तोडल्याचा गुन्हा
पनवेलहून आल्यानंतर होम क्वारंटाईन न राहता सर्वत्र फिरून इतर लोकांशी संपर्क केल्याने वधूचा मामा आणि नगर येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर वेगळा गुन्हा नोंद केला आहे. यातही खाकाळ हेच फिर्यादी आहेत. २९ तारखेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लोकांमध्ये विवाह झाल्याची माहिती समितीला नसणे, हे संशयास्पद आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगने दक्षता समिती व ग्रामसेवकाच्या कारभाराचा पर्दाफाश केला. प्रत्येक गावात दक्षता समिती तयार केली आहे. ५ जुलै रोजी आपल्याला माहिती समजल्याचे ग्रामसेवकांनी फिर्यादीत नमूद केले आहे. २९ जून ते ५ जुलै दरम्यान हा प्रकार का समोर आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.