मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा, आवड निर्माण होईल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:27 PM2020-02-14T18:27:33+5:302020-02-14T18:27:47+5:30
वृक्ष लागवड चळवळीसाठी स्थानिकांचा सहभाग हवा
बीड : मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा. त्यांना महत्त्व सांगा. तसे केल्यास झाडाशी आणि निसर्गाशी त्यांची मैत्री होईल, असे प्रतिपादन कराड तालुक्यातील रेठरे येथील कृेणा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गवताळ परिसंस्थेचे अभ्यासक चंद्रकांत साळुंके यांनी केले.
पालवन परिसरातील सह्याद्री देवराई येथे वृक्ष संमेलनात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना साळुंके म्हणाले, ५० वर्षांच्या झाडाची किंमत १५ लाखांहून अधिक आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मुलांना मोबाईल आवडतो मग झाड का आवडू नये? मुलांना सभोवतालच्या झाडांची माहिती हवी, त्याची किंमत कळावी. जे झाड लावता त्याची माहिती द्या, प्रोफाईल करा, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षसंगोपन असे करा
वृक्ष संगोपनासाठी पाचवी ते नववीचे विद्यार्थी केंद्रीत करावेत. या वयोगटातील मुलांवर संस्कार खोलवर रुजत असतात. परिसरातील शाळा आणि विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन गटनिहाय शिक्षकांच्या मार्गदर्शनातून या वृक्ष संगोपनावर भर द्यायला हवा. या मोहिमेत स्थानिक लोकांची मदत घ्यावी, असे चंद्रकांत साळुंके म्हणाले.
वृक्ष लागवड चळवळीसाठी स्थानिकांचा सहभाग हवा - औटे
वृक्षलागवड चळवळ विकसित करण्यासाठी स्थानिक लोकांना सोबत घेणे महत्त्वाचे आहे. शेतकरी, गुराखी, मेंढपाळांकडे ज्ञान असते. ते ज्ञान वैज्ञानिक दृष्टीने पारखले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था बांधण्याची सामाजिक चळवळ निर्माण करून परिसर पुनर्निर्माण करता येईल, असे मत पुणे येथील सतीश औटे यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावली पाहिजेत हेही लक्षात घ्यावे. फळझाडे लहान मुलांच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. आंब्याच्या २०० पेक्षा जास्त जाती असून त्या नष्ट होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ६० गावांत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अंब्याच्या पाच जाती शोधल्याचे ते म्हणाले. आमराया, बोरवन, जांभूळवन निर्माण करून शाळा आणि मुलांच्या वेळेचा सदुपयोग करा. मुलांचा सहभाग घेताना त्यांची रूची लक्षात घ्यावी, असेही ते म्हणाले.
अबोल झाडांना बोलके केले - सुधाकर देशमुख
सह्याद्री देवराई परिसरातील जगातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाने अबोल झाडांना बोलकं करण्याचे काम केल्याचे प्रतिपादन वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी केले. मागील दोन दशकांपासून देशमुख हे सहकुटूंब या चळवळीत कार्यरत आहेत. वृक्षलागवडीसोबतच त्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. शासनपातळीवर वृक्षसंवर्धनाच्या अनुषंगाने लढा देत असतानाच पर्यावरण जनजागृतीसाठी ममदापूर पाटोदा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काम करत आहोत. वृक्षगणनेसाठी सरकारदरबारी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. लोकसंख्येप्रमाणे वृक्षसंपदेचे फलक लागावे असे मत व्यक्त करताना ‘वृक्ष गणना करा, आनंदी होईल वसुंधरा’ अशी जोड त्यांनी दिली.
‘अच्छी नजर से देखो, पेड जिंदगी है’
‘अच्छी नजर से देखो, पेड जिंदगी है साब’ असे म्हणत हिंगोली येथील वनपाल टी. एम. सय्यद यांनी संग्रहित केलेल्या वनसंपदेतील विविध आकाराच्या काष्ठशिल्पांकडे सर्वांचे लक्ष वेधले. झाडांमध्ये जीवसृष्टी सामावलेली आहे. झाडांचा बुंधा, फांद्या यांना निसर्गत: आकार येतो. यातून सूक्ष्म निरीक्षण केले तर वेगळी अनुभूती देणारे आकार मानवी जीवनाशी निगडित असल्याचे दिसते. महाराष्ट्रात भ्रमंती करत विविध पक्षी आणि प्राण्यांचे, मानवी संवदेना व्यक्त करणारी ७५ पेक्षा जास्त काष्ठशिल्प सय्यद यांनी संग्रहित केले आहेत. त्यांच्याकडे २०० बियाणांचा संग्रह निसर्गप्रेमींना अचंबित करतो. नजरेवर सर्व काही अवलंबून असल्याचे सांगत सय्यद म्हणाले, झाडे नसतील तर अन्नसाखळी राहणार नाही. अच्छा देखो, मानवी हातात भविष्य आहे. वृक्ष लावा, वृक्ष जगवा हेच आवाहन आपण काष्ठशिल्प स्टॉलच्या माध्यमातून करतो. वरिष्ठांचे पाठबळही मिळते, असे सय्यद म्हणाले.