पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:53+5:302021-09-24T04:39:53+5:30
बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत ...
बीड : कोरोनामुळे लोक घरातच बसले. त्यामुळे बाहेर फिरून व्यायाम करायची सवयच अनेकांची मोडली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. चालायचे बंद झाल्याने गुडघा, कंबरदुखी सारखे आजार वाढले आहेत. यात तरुणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहिले तरी व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मागील दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात कोरोनाने आगमन केले. हा आजार संसर्गजन्य असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी लोकांना घरातच बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे वॉकिंग, व्यायाम, खेळणे आदी सवय मोडल्या आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. घरातच बसून राहिल्याने अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता या सवयी पुन्हा लावून घेण्याची गरज आहे. यामुळे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल, असेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एकाच जागेवर राहिल्याने आणि न चालल्यास हाडांचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली
तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत
--
हे करून पाहा
एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा.
कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या.
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.
---
म्हणून वाढले हाडांचे आजार...
चालणे कमी झाल्याने अनेकांची शरीर लठ्ठ झाले आहे. तसेच हाडांचा ठिसूळपणा, संधिवात यांसारखे हाडांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित फिजिओथेरपी करणे गरजेचे आहे.
---
ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी....
जे लोक वृद्ध आहेत; अथवा वेगवेगळ्या कारणास्तव चालूच शकत नाहीत, त्यांनी बसल्या जागेवर व्यायाम करणे गरजेचे आहे. ज्यात पाय हलवणे, हात हालवणे, मान हालवणे तसेच कॅल्शियमयुक्त आहार घेण्याची गरज आहे.
---
चालण्याची सवय मोडल्याने गुडघादुखी, कंबरदुखीसारखे आजार वाढतात. त्यामुळे नियमित व्यायाम व चालण्याची गरज आहे. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनीही बसल्या जागेवर व्यायाम करून पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.
डॉ. अमित बायस, अस्थिरोगतज्ज्ञ, बीड
230921\23_2_bed_10_23092021_14.jpeg
डॉ.अमित बायस