टेलरिंगच्या नावाखाली चालवायची कुंटणखाना; आंटीला अटक, पीडितेची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 12:49 PM2022-01-21T12:49:42+5:302022-01-21T12:51:45+5:30
यापूर्वी देखील वेश्याव्यवसाय करवून घेताना तिला पकडले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बीड : टेलरिंगच्या नावाखाली सर्रास महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आंटीला एएचटीयूने (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष) अटक केली. यावेळी एका पीडितेची सुटका केली. ही कारवाई १९ जानेवारी रोजी शहरातील पेठ बीड ठाणे हद्दीत करण्यात आली.
स्वाती गणेश कंधारे (३८, रा. शाहूनगर, पांगरी रोड, बीड, हमु. कुर्ला रोड, एमआयडीसी, बीड) असे त्या आंटीचे नाव आहे. तिचे अंबिका चौकालगत मिनी बायपास रोडवर टेलरिंगचे दुकान आहे. तेथे काही महिलांना बोलावून टेलरिंगच्या नावाखाली ती कुंटणखाना चालविते, अशी माहिती एएचटीयूच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुरेखा धस यांना मिळाली होती. त्यानुसार एका पंटरमार्फत स्वाती कंधारेला कॉल केला असता तिने दुकानाऐवजी घरी यायला सांगितले. त्यानुसार १९ रोजी दुपारी तीन वाजता सापळा लावला. पंटरकडून एक हजार रुपये घेऊन ३५ वर्षीय महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर पंटरने इशारा करताच पोलीस धडकले.
पीडितेची सुटका केली तर स्वाती कंधारे हिला अटक केली. पेठ बीड ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ, सहायक निरीक्षक सुरेखा धस, भरोसा सेलच्या प्रमुख उपनिरीक्षक मनीषा लटपटे, शिवाजी भारती, सहायक उपनिरीक्षक प्रताप वाळके, म.पो.ह. सुरेखा उगले, नीलावती खटाणे, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे यांनी कारवाई केली. तपास शहर ठाण्याचे निरीक्षक रवी सानप करत आहेत.
एक दिवसाची पोलीस कोठडी
पीडितेची महिला सुधारगृहात रवानगी केली तर आंटी स्वाती कंधारे हिला २० रोजी न्यायालयापुढे हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. रवी सानप यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी देखील वेश्याव्यवसाय करवून घेताना तिला पकडले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.