बहिणीसमोरच भावाचा मृत्यू; भीषण अपघातात नवशिक्या कार चालकासह बाईकस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 11:08 AM2021-11-10T11:08:30+5:302021-11-10T14:58:34+5:30
नवशिक्या कार चालकाने बाईकला उडवल्यानंतर चालकासह बाईकस्वाराचा मृत्यू, बाईकवरील दोघे जखमी झाले आहेत.
केज (बीड ) : केज तालुक्यातील साळेगाव येथे कळंब रस्त्यावर सकाळी सहा वाजेदरम्यान एका नवशिक्या कार चालकाने बाईकला उडवले. यात कार चालक अमित बाराते आणि बाईकस्वार अमोल सत्वधर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकवरील एक महिला व मुलगा हे दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटार सायकलला धडकली असावी. त्यानंतर ती कार अनेक वेळा पलटी खाल्ल्याने चकनाचूर झाल्याचे दिसत आहे.
दिवाळी-भाऊबीजेला अमित सत्वधर याची बहीण माहेरी आली होती. बस बंद असल्याने आज सकाळी सहा वाजे दरम्यान अमोल बहिणीला आणि भाच्याला तिच्या सासरी सोडण्यासाठी बाईकवरून घेऊन जात होता. याच दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर एका भरधाव कारने (एम एच २५/एएस ७५९० )ने अमोलच्या बाईकला (एम एच ४४/वाय२१५३) धडक समोरून जोरदार धडक दिली. यानंतर कार पुढे जाऊन उलटली. या भीषण अपघातात अमोल सत्वधर आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते (२२ वर्ष रा. कळंब ) हे दोघे जागीच ठार झाले. तर बाईकवरील अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पाचपिंडे, गवळी, गायकवाड, शिनगारे, सानप, शेख, गित्ते, हनुमंत गायकवाड हे सर्व पोलीस कर्मचारी हजर झाले व रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थ यांनी मदत केली.
बहिणीला सासरी सोडण्यासाठी जात होता
दिवाळीच्या भाऊबिजेला माहेरी केज येथे आलेल्या बहिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी एसटीचा संप असल्याने अमोल बाईकवरून बार्शी तालुक्यात सासरी सोडण्यासाठी जात होता. त्यात गाडी चालविण्यास शिकत असलेल्या नवख्या चालकाने त्यांना धडक दिली. यात बहिणीसमोरच भावाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या गाडीने त्यांना धडक दिली ती गाडी कळंब येथील बाराते यांची असून आठ दिवसांपूर्वीच त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे. अमित बाराते हा त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन गाडी शिकत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने तो स्वतः मयत झाला सोबत बाईकस्वार अमोल सत्वधर याचाही जीव गेला.