स्वार्थापुढे नाते तुटले; स्वस्त धान्य दुकानाच्या वादातून भावानेच भावाला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:46 PM2021-09-01T17:46:21+5:302021-09-01T17:48:52+5:30
Crime In Beed : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू
कडा ( बीड ) : सतत अठरा वर्ष स्वस्त धान्य दुकान चालवत असलेल्या चालकाकडील दुकान त्याच्याच सख्ख्या भावाकडे गेलेले दोन वर्ष झाली होती. दुकान परत मिळविण्याच्या वादातून भावानेच दुकान चालक भावास सोमवारी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारा दरम्यान त्या भावाचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी भावासह आठ जणांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील भोजेवाडी येथील लक्ष्मण आश्रुबा खटके हे १८ वर्ष स्वस्त धान्य दुकान चालवत असे. मात्र, मागील मागील दोन वर्षांपासून त्याचा भाऊ ज्ञानदेव आश्रुबा खटकेंकडे ( ४२ ) दुकानाचा परवाना आला होता. याच रागातून लक्ष्मण आणि ज्ञानदेव यांच्यात सतत वाद होत. सोमवारी लक्ष्मण आणि त्याच्या घरातील इतर सात व्यक्तींनी ज्ञानदेव यांना जबर मारहाण केली. यात ज्ञानदेव गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज उपचारादरम्यान ज्ञानदेव यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना ! आईच्या मानेवर विळयाने वार करून मुलाची आत्महत्या
या प्रकरणी ज्ञानदेव खटके यांचा मुलगा लहू याने चुलते आणि इतर सात जणांविरोधात फिर्याद दिली. यावरून अंभोरा पोलिस ठाण्यात लक्ष्मण आश्रुबा खटके, सिंधूबाई लक्ष्मण खटके, बाळासाहेब लक्ष्मण खटके, मनीषा लक्ष्मण खटके, युवराज लक्ष्मण खटके, सचिन दादासाहेब लकडे, दादासाहेब रामराव लकडे आणि भागीनाथ रामराव लकडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपी अटकेत असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.
हेही वाचा - डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे महिला रुग्णाशी अश्लील चाळे, गुन्हा दाखल