बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:03 AM2019-11-10T00:03:40+5:302019-11-10T00:04:33+5:30
जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली.
बीड : जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
शेख आमेर शेख जाफर (वय ३०, रा. राजीवनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री ७ वाजता अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत कर्तव्यावर असलेल्या रतन बडे या ब्रदरला मारहाण केली. टेबल फेकून देत कागदपत्रेही फाडली. ही घटना समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालय गाठले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. उप अधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणाव होता.
दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर सर्व परिचारिका व कर्मचारी, डॉक्टर एकत्रित आले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित कामबंद आंदोलन पुकारत कडक कारवाईची मागणी केली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. बाबासाहेब ढाकणे, परिचारिका संगीता दिंडकर, शीला मुंडे, संगीता सिरसाट, स्वाती माळी, संगीता क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, सेवक यांची मोठी उपस्थिती होती.
काय आहे नातेवाईकांचा आरोप ?
आमेर शेख यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा ते जिवंत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर काही वेळांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गोंधळ कायम होता.
कडेकोट बंदोबस्त
मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप होते. रात्री उशिरापर्यंत हा तणाव कायम होता.