शिवस्वराज्य, महाजनादेश यात्रेतही भाऊबंदकी अन् गटबाजीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:38 AM2019-08-27T06:38:29+5:302019-08-27T06:38:44+5:30
शिवस्वराज्य यात्रेचा जिल्ह्यातील समारोप बीड येथील जाहीर सभेने झाला.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत भाऊबंदकी, तर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाजनादेश यात्रेत अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन पहावयास मिळाले.
बीड येथे रविवारी रात्री झालेल्या शिवस्वराज्यच्या सभेत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली तर महाजनादेश यात्रा आष्टी मतदारसंघात आली असता आ. भीमराव धोंडे आणि विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्यातील गटबाजी मुख्यमंत्र्यासमोरच पहावयास मिळाली. शिवस्वराज्य यात्रेचा जिल्ह्यातील समारोप बीड येथील जाहीर सभेने झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत बीड विधानसभेचे इच्छुक उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करीत जहरी टीका केली. ५० कोटी रुपये देऊन मंत्रीपद मिळवले. संस्था, दारू दुकान, रॉकेलचे लायसन्स हेही धंदे माझ्या काकांचेच. लोकांच्या जमिनीही हडप केल्या आणि आमच्यावर मात्र अडीच कोटी रुपयांचे कर्ज केले, असे अनेक आरोप त्यांनी केले.
दुसरीकडे भाजपातही अलबेल आहे, असे नाही. आष्टी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आ. भीमराव धोंडे आणि विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्यातील गटबाजी महाजनादेश यात्रेत पहावयास मिळाली. नियोजित दौऱ्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आष्टीत होती. या सभेचे नियोजन आ. धोंडे यांच्याकडे होते. असे असताना आष्टीच्या कार्यक्रमापूर्वी आ. सुरेश धस यांनी कड्यात कार्यक्रम ठेवून फडणवीस यांना व्यासपीठावर नेऊन बोलावयास भाग पाडले. तत्पूर्वी धस समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांचे समर्थक हे धसांचे पुत्र जयदत्त धस यांना या यात्रेत डोक्यावर घेऊन नाचतांना दिसत होते.