भाऊंच्या गटाची परळीत तर ताईंच्या गटाची मुंबईत खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:04 AM2021-02-21T05:04:07+5:302021-02-21T05:04:07+5:30
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे या निवडणुकीत नेत्यांचाच कस लागणार आहे. भाऊंच्या गटाची परळीत ...
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे या निवडणुकीत नेत्यांचाच कस लागणार आहे. भाऊंच्या गटाची परळीत तर ताईंच्या गटाची मुंबईत बैठक होऊन खलबते झाल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. दोन्ही गटांकडून उमेदवारीबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. तर पंकजा मुंडे गटाकडून सर्व १९ जागा लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. नामनिर्देश पत्र मागे घेण्याच्या दिवसानंतरच बँकेची राजकीय स्थिती स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत १५ फेब्रुवारीपासून २९९ अर्जांची विक्री झाली असून ३२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. असे असलेतरी प्रत्यक्षात २६ उमेदवारांचे हे नामनिर्देशनपत्र असून २२ रोजी शेवटच्या दिवशी किमान १०० अर्ज दाखल होतील असा अंदाज आहे. मागील पाच वर्षात जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सक्षम बनली असलीतरी विविध विषयांच्या अनुषंगाने सहकारी कार्यालय, पोलीसात दाखल गुन्हे व इडीच्या चौकशीमुळे या निवडणुकीत मैदानात उतरायचे की नाही? याबाबत अनेकजण विचार करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत फारसा उत्साह दिसून आलेला नाही.
आतापर्यंत सेवा सोसायटी मतदार संघातून वसंत सानप, भाऊसाहेब नाटकर, विजयसिंह पंडीत, बापुराव सिरसट, जीवन जोगदंड, फुलचंद मुंडे, जयदत्त धस, अशोक पवार, महेंद्र गर्जे, सुशिला पवार, महिलांमधून अर्चना सानप, सुशिला पवार, तर इतर संस्था वै. मतदार संघातून नवनाथ शिराळे, रामदास खाडे यांनी तर कृषी व पणन मतदार संघातून आसाराम मराठे, भाऊसाहेब नाटकर यांचे व इतर मतदार संघातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल आहेत.
--------
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
जिल्हा बँकेत संचालकांच्या १९ जागा आहेत. तर १३७५ मतदार आहेत. विकलेल्या अर्जांची संख्या लक्षात घेत बहुतांश इच्छुक आपले इप्सित साध्य करून घेण्याच्या तयारीत आहेत. अर्ज भरू नका अथवा अर्ज भरा , असे नेते मंडळी कोणाकोणाला सांगणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे हौशी इच्छुक हे दोन्ही गटांच्या नेत्यांसाठी डोकेदुखीचे ठरणार आहे.
---------
सत्ताधारी गट लढणार सर्व जागा
जिल्हा बँकेत सत्ताधारी गटाकडे १४ तर विरोधी गटाकडे ५ संचालक आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागा आपल्याकडे खेचण्याची तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व १९ जागा सर्व ताकदीनिशी लढण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.त्यामुळे विरोधी गट आपल्या जागा शाबूत ठेवण्यासाठी कसा प्रयत्न करतात, हे पहायला मिळणार आहे.
-------
परळीतही खलबते
आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे अनेकांचे मत असलेतरी निवडणूक बिनविरोध हाेण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही गटाकडून प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येत आहे. परळीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने एकत्र आलेल्या नेत्यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रणनीतीवर चर्चा झाली.
----------