भावाचा संशयास्पद मृत्यू; बहिणीचा थेट सुप्रीम कोर्टात लढा, अखेर चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:50 PM2024-02-13T18:50:01+5:302024-02-13T18:51:39+5:30
चार वर्षानंतर बहिणीच्या लढ्याला यश; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश
- मधुकर सिरसट
केज: भावाच्या संशयास्पद मृत्यूनंतर चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा लढा एका बहिणीने थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला. अखेर चार वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने चारही जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
केज तालुक्यातील बनकरंजा येथील शिवाजी मारुती बांगर यांचा दि.3 एप्रिल 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दि. 5 एप्रिल 2020 रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, हा मृत्यू दुचाकीवरून पडून झाला नसून मारहाण केल्यामुळे झाल्याचा संशय शिवाजी बांगर यांची बहीण सिंधु जनक नागरगोजे यांनी व्यक्त केली होती.
सिंधु यांची काय आहे तक्रार
दि. 2 एप्रिल 2020 रोजी दत्ता रामचंद्र मैंद यांनी शिवाजी यास ऊसतोड टोळीचा हिशोब करण्यासाठी चिंचपूरच्या दिशेने घेऊन गेले होते. येथे मारहाण करुन जखमी अवस्थेत प्रथम धारूरला त्यानंतर अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, दुसऱ्या दिवशी दि.3 एप्रिल 2020 रोजी दुपारी शिवाजी बांगर यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब), दिलीप बाबासाहेब नागरगोजे (लांब), बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे (लांब) सर्व रा. बनकरांजा आणि दत्ता रामचंद्र मैद यांनी खून केला असल्याची तक्रार सिंधु नागरगोजे यांनी केली होती.
असा दिला बहिणीने लढा
या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सिंधु नागरगोजे यांनी याचिका दाखल करुन याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.परंतु न्यायाधिशांनी या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक झोटे यांना तपास करून खंडपीठाला तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी आरोपिंना अभय देत खंडपीठाला अहवाल सादर केला होता. त्यामुळे सिंधु नागरगोजे यांनी सर्वोच्च न्यायालयात २१ नोव्हेंबर २०२० धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनंतर न्यायमुर्ती बेला. एम. त्रिवेदी व दिपानकर दत्ता यांनी या प्रकरणात चार जणांवर विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तब्बल चार वर्षानंतर दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधू नागरगोजे यांच्या तक्रारी वरून मयत भाऊ शिवाजी बांगर याच्या मृत्यू प्रकरणी बाबासाहेब तुळशीराम नागरगोजे (लांब), दिलीप बाबासाहेब नागरगोजे (लांब), बालासाहेब बाबासाहेब नागरगोजे (लांब) सर्व रा. बनकरांजा आणि दत्ता रामचंद्र मैद रा. मैंदवाडी ता. धारूर या चौघा विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करित आहेत. फिर्यादी सिंधु नागरगोजे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात ॲड. मल्हारी अदाटे व ॲड. अमेय सबणीस यांनी बाजू मांडली. तर सर्वोच्च न्यायालयात ॲड सुधांश्यू चौधरी यांनी बाजू मांडली.