‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:03 AM2019-12-18T01:03:19+5:302019-12-18T01:03:42+5:30

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कसलीच सेवा मिळत नसल्याचे समोर आले

'BSNL' service on paper; Fury among consumers | ‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष

‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील सर्वच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. याचा मोबदलाही भरलेला आहे. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कसलीच सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. ५० पैकी ३५ ठिकाणी अद्यापही सेवा मिळालेली नसल्याने यंत्रणा ‘आजारी’ पडली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून पत्रव्यवहार केला असला तरी अधिकारी अनभिज्ञच आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष आहे.
जिल्ह्यात ११ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये आणि ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. यासाठी १९ हजार १९९ रूपये शुल्कही भरले होते. वर्ष उलटूनही अद्याप काही आरोग्य केंद्रात ही सेवा सुरू झालेली नाही. याबाबत सप्टेंबर महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी पत्र पाठवून सर्व माहिती दिली होती.
यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यात प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप ३५ ठिकाणची सेवा बंदच आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग वैतागला असून ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये धाव घेण्याच्या तयारीत आहे. याला संबंधित अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
बीएसएनएलच्या या गलथान सेवेमुळे ग्राहक खाजगी कंपन्यांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्राहकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये - धारूर, पाटोदा , शिरूर, वडवणी, प्राथमिक आरोग्य केंद्रे - आपेगाव, बर्दापूर, भावठाणा, उजणी, धामणगााव, कुंठेफळ, सुलेमान देवळा, टाकळसिंग, नाळवंडी, साक्षाळपिंपरी, ताडसोन्ना, येळंबघाट, चकलांबा, जातेगाव, निपाणी जवळका, तलवाडा, आडस, चिंचोली माळी, गंगामसला, किट्टी आडगाव, सादोळा, धर्मापूरी, मोहा, नागापूर, पोहनेर, अंमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव, वाहली, खालापुरी, शिरूर येथील इंटरनेट सेवा बंद असल्याचे आरोग्य विभागाकडून लेखी स्वरूपात सांगण्यात आले.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर यंत्रणेला जाग
सप्टेंबर महिन्यात पैसे भरूनही इंटरनेट सेवा बंद असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले होते. यावर बीएसएनएलचे अधिकारी खडबडून जागे झाले होते. यंत्रणा कामाला लावली होती. आठवडाभर सेवा सुरळीत मिळाली. आता मागील दोन महिन्यांपासून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून अधिका-यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर वरिष्ठांनी बीडच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.

Web Title: 'BSNL' service on paper; Fury among consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.