दशक्रिया विधीसाठी १० रुपयांत मिळते बकेटभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:24 AM2019-05-05T00:24:11+5:302019-05-05T00:24:43+5:30
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथ येथे दशक्रिया विधीसाठी भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गोदावरी पात्र कोरडे पडल्याने आंघोळीसाठी पाणीच राहिले नसल्याने भाविकांचा हिरेमोड होत असताना येथील काही नागरिकांकडून बुडक्या खोदून त्याद्वारे एका पाण्याच्या बकेटीला १० रु पये घेतले जात आहेत.
पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथ येथे दशक्रिया विधीसाठी भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गोदावरी पात्र कोरडे पडल्याने आंघोळीसाठी पाणीच राहिले नसल्याने भाविकांचा हिरेमोड होत असताना येथील काही नागरिकांकडून बुडक्या खोदून त्याद्वारे एका पाण्याच्या बकेटीला १० रु पये घेतले जात आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातील श्रध्देने येणाºया भाविकांची मात्र आर्थिक कुचंबना होताना दिसत आहे.
तालुक्यातील मंजरथ याठिकाणी गोदावरी, सरस्वती व सिंदफणा या तीन नद्यांचा संगम होतो. यामुळे मंजरथ या गावाला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. बीड जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही दररोज शेकडो भाविक येथे दशक्रिया विधीसाठी येतात. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्रिवेणी संगमावर पाणी फेब्रुवारीपासूनच आटत चालले होते. एप्रिल अखेरीस संपूर्ण पाणी आटले.
शुक्रवारी मंजरथ येथे गोदावरी पात्रातील परिस्थिती पाहण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता गोदाकिनारी वृषकपेश्वर मंदिराच्या खालील भागात एक छोटासा डोह दिसून आला. मोठ्या प्रमाणावर गाळामुळे या डोहात पाय ठेवताच फसतो तसेच सर्व पाणी गाळयुक्त होते. तेथे दिसलेल्या युवकांना ही बुडकी कोणी खोदली व कशाचे पैसे घेता अशी विचारणा केली असता ही बुडकी आम्ही वैयक्तिक खोदली असून तुम्ही विचारणारे कोण? असा प्रश्न केल्यानंतर पत्रकार म्हणताच ते तिघेही इकडे तिकडे फोन लावू लागले.
ही माहिती दिल्यानंतर सरपंच प्रतिनिधी राजेंद्र आंनदगावकर म्हणाले, भाविकांच्या स्नानाची व्यवस्था आम्ही वर केली आहे. परंतु गोदावरीच्याच पाण्याने स्नान करण्याची श्रद्धा असल्याने भाविक गढूळ पाण्यानेच आंघोळ करतात. त्यामुळे गावातील काही युवकांनी बुडकी खोदली.
या बुडकीचे पाणी शुद्ध असल्याने याकडे भाविकांची ओढ वाढली व यातून भाविक कितीही पाणी घेऊ लागल्याने या ठिकाणी युवक थांबू लागले. आपला रोजगार निघावा म्हणून हे युवक भाविकांकडून नाममात्र पैसे घेत असतील, असे ते म्हणाले.
गोदापात्रात बुडकी
डोहातच महिला भाविक आंघोळ करत असल्याचे आढळले. शेजारीच काही भाविक आंघोळ करत असल्याचे दिसल्याने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.तेथे एक बुडकी आढळून आली. ही बुडकी गोदापात्रात ३-४ फूट खोदण्यात आली. दोन फुटावर एकदम स्वच्छ पाणी दिसत होते व येथून काही भाविक बकेटीने पाणी घेऊन जात होते. याबाबत विचारले असता ३-४ युवक छोटयाशा मांडवात आढळून आले व त्यांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे का ? तुम्ही किती जण आहात अशी विचाल्यानंतर मी एकटाच असल्याचे सांगताच त्याने दहा रूपयांची मागणी केली.