लोखंडी सावरगाव कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी प्रयोगशाळा निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:36+5:302021-05-19T04:34:36+5:30
अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांच्या कोविड ...
अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांच्या कोविड व इतर तपासणीसाठी आवश्यक असणारी अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
यासंदर्भात सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये प्रयोगशाळा नसल्याकारणाने तेथील रुग्णांच्या कोविड प्रोफाईल चाचण्यांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, लोखंडी सावरगाव येथील प्रयोगशाळेत रिएजंट कमी प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणून सदर रुग्णालयातील रुग्णांना कोविड प्रोफाईल व इतर तपासण्या खासगी लॅबमध्ये कराव्या लागतात. तपासण्या करण्यासाठी खासगी लॅबमध्ये २५०० ते ३००० रुपये खर्च येतो. तरी त्यासाठी लागणारे तांत्रिक साहित्य आणि रिएजंट उपलब्ध करून देण्याची मागणी अधीक्षक, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगाव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, बीड यांच्याकडे केलेली आहे. परंतु अद्यापही त्यावर काहीही कार्यवाही नाही. तरी प्रयोगशाळेला लागणारे तांत्रिक साहित्य आणि रिएजंट उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून गरीब रुग्णांचा खर्च होणार नाही.
सदर कोविड सेंटरमध्ये ग्रामीण भागातून रुग्ण येतात. खर्च करण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व तपासण्या व इतर तपासण्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, लोखंडी सावरगाव येथेच होण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली आहे.