बीडमधील चार ठाण्यांना हवी हक्काची इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:53 AM2018-07-09T00:53:44+5:302018-07-09T00:54:24+5:30
पडक्या आणि किरायाच्या इमारतीत बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान बीड जिल्हा पोलीस दलासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल चार पोलीस ठाणे आणि नऊ पोलीस चौकी किरायाच्या जागेत असल्याचे समोर आले आहे.
बीड : पडक्या आणि किरायाच्या इमारतीत बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान बीड जिल्हा पोलीस दलासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल चार पोलीस ठाणे आणि नऊ पोलीस चौकी किरायाच्या जागेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस विभागाकडून जागा आणि नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु गृह विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. अपुºया जागेत बसून कामकाज करताना पोलिसांना अनेक अडचणी येत असल्याचे समजते.
जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, दोन अपर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, २८ पोलीस ठाणे आणि ९ पोलीस चौकी आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातच अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. तसेच बीडचे शिवाजीनगर पोलीस ठाणे हे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थानात आहे. तसेच अंमळनेरचे पोलीस ठाणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या शासकीय विश्रामगृहात आहे. परळीचे संभाजीनगर पोलीस ठाणे सुद्धा शहर पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमध्येच आहे. तसेच बीडमधील पेठबीड पोलीस ठाणे हे नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या इमारतीत कार्यरत आहे.
हक्काच्या आणि सुसज्ज इमारती नसल्याने येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गृह विभागाकडे याचा प्रस्तावही पाठविला आहे. परंतु अद्याप यावर कसलीच कारवाई झालेली नाही.
कर्तव्यदक्ष विभाग म्हणून ओळखल्या जाणाºया पोलीस दलातच आता महत्वाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात धुळ खात पडून असल्याचे पहावयास मिळत आहे.
सर्वच पोलीस चौक्या किरायाच्या जागेत
जिल्ह्यात ९ पोलीस चौकी या किरायाच्या जागेत आहेत. यामध्ये लिंबागणेश, धानोरा, कडा, घटनांदूर, परळी थर्मल, आडस, महामार्ग गेवराई, चौसाळा आणि सायगाव या चौकींचा समावेश आहे. या नऊ चौकींना मिळून प्रतिमहिना ७ हजार रूपये भाडे दिले जात आहे.
नगर रोडवर जागा प्रस्तावित
बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी नगर रोडला पेट्रोल पंपाजवळ जागा निश्चीत करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु निधी आणि इतर तांत्रीक अडचणींमुळे याच्या कामास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
लॉकअप नसल्याने आरोपी ठोकताहेत धूम
ठाण्यांना हक्काच्या इमारती नसल्याने आहे त्या परिस्थिती कामकाज चालविले जात आहेत. अनेक ठाण्यांना लॉकअप नाहीत. बीडमधील बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पिंपळनेर या ठाण्यांमध्ये लॉकअपची सोयच नाही. या सर्व ठाण्यांतील आरोपी हे बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवले जातात. ठाण्यांमध्येच लॉकअप नसल्याने शिवाजीनगर ठाण्यातून आरोपींनी धुम ठोकल्याच्या घटना घडल्या आहेत.
अंमळनेरमध्ये तर बसायलाही जागा नाही
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हे शासकीय विश्रामगृहात कार्यरत आहे. चार खोल्या असलेल्या या इमारतीत कामकाज करताना अनंत अडचणी येत आहेत. आरोपीला ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नाही, शिवाय कर्मचाºयांना संगणकीय काम करण्यासाठी अपुरी जागा आहे. तक्रारदार आले तर त्यांना साधी बसायलाही जागा नाही. १० ते १५ लोक भेटायला आले तर अधिकाºयांना आपल्या केबीनमधून उठून खाली येण्याची नामुष्की येते.
पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा वाढल्या
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर रूजू झाल्यापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांना आयएओ मानांकन प्राप्त झाले. ठाण्यांतील कारभारही सुधारला. कारवायाही जोरात झाल्या. आता सर्व ठाण्यांना हक्काच्या आणि सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज इमारती उभारण्यासाठी त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. बदलीपूर्वी त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलीस अधिकारी, कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.