मंदिरापेक्षा ज्ञानमंदिर बांधणे कधीही चांगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:45 AM2019-06-18T00:45:43+5:302019-06-18T00:46:05+5:30
मंदिर बांधण्यापेक्षा ज्ञानमंदिर बांधा असे मत शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : समाजात अनेक लोक श्रीमंत आहेत. मात्र, मनाने श्रीमंत असणारे फार मोजके लोक आहेत. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असावी लागते आणि त्यानंतरच अशा ५०- ५० लाखांच्या वास्तू अगदी काही दिवसात उभ्या राहतात. यापुढे गावात मंदिर बांधण्यापेक्षा ज्ञानमंदिर बांधा असा सल्ला देत सुकळीच्या बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड यांचा आदर्श घेतला पाहिजे असे मत शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सुकळी येथील ५० लक्ष रुपयांच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण १० रुपये खर्च करताना विचार करतो. मात्र, या गायकवाड बंधूनी आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेसाठी तब्बल ५० लाख रुपयांची इमारत बांधून दिली. दोन्ही दानवीर बंधूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे आणि यांचा आदर्श घेऊन अशा लोकांनी सामाजिक कामात अग्रेसर राहिले पाहिजे असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी गायकवाड कुटुंबीयांसह जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, संतोष सोनवणे, हनुमंत भोसले, दीपक नाईकवाडे, दिनकर राऊत, गौतम बचुटे, सुकळीचे सरपंच गिरी, उपसरपंच गायकवाड, केंद्रप्रमुख, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, गावकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.