बीड जिल्हा रूग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपयांची इमारत धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:32 AM2018-06-23T00:32:52+5:302018-06-23T00:33:18+5:30
बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात पत्रव्यवहारही झाला. परंतु बांधकाम विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले.
३२० खाटांचे जिल्हा रुग्णालय आहे. परंतु अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) स्वतंत्र जागा नाही. तळमजल्यातच एसी उपलब्ध करुन आयसीयू कक्ष बनविण्यात आला. त्यामुळे उपचार करण्यासह घेणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत असे. तसेच जागाही अपुरी पडत होती. हाच धागा पकडून रुग्णालयाच्या बाजूलाच सव्वा कोटी रुपये खर्चून दोन मजली इमारत उभारण्यात आली. दीड वर्षांपूर्वी तिचे कामही पूर्ण झाले.
वीज, फरशी अशी किरकोळ कामे बाकी राहिल्याने ती अद्यापही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिलेली नाही. ही कामे पूर्ण करुन इमारत ताब्यात द्यावी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही ही इमारत धूळ खात आहे. बांधकाम विभागाबद्दल सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काम निकृष्ट झाल्याची चर्चा
इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचे सूत्रांकडून समजते. खोल्यांमधील टाईल्स फरशी गळून पडली आहे. याबाबत दुरुस्ती करण्यास सांगितले असता बांधकाम विभागाने या फरशीला सिमेंट लावून न चिटकवता खिळे मारल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यावरुन बांधकाम विभागाचा कारभार कसा चालतो हे स्पष्ट होते. या निकृष्ट कामाची चर्चाही जोरात सुरु आहे. बांधकाम विभागाचे अभियंता नाईकवाडे यांच्याशी वारंवार संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने बाजू समजली नाही.