पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त
By सोमनाथ खताळ | Published: February 14, 2024 09:14 PM2024-02-14T21:14:55+5:302024-02-14T21:15:32+5:30
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली.
बीड : पुणे व लगतच्या जिल्ह्यात दुचाकी चोरूनबीडला आणून विक्री करणाऱ्या बुलेट चोराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्याकडून सात दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी दुपारी शिवराज पान सेंटर परिसरात करण्यात आली. सुरज शंकर गायकवाड (वय २५ वर्षे रा.संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड, पुणे) असे या चोरट्याचे नाव आहे.
शंकर हा पुणे व परिसरातील जिल्ह्यात बुलेट व इतर कंपनीच्या दुचाकी चोरतो. त्या आपल्या नातेवाईकांच्या आहेत, असे सांगून बीड जिल्ह्यात आणून विक्री करतो. असे करतानाच त्याला यापूर्वीही बेड्या ठोकल्या होत्या. काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा आपले कारनामे सुरू केले. तो बुधवारी बीडमध्ये विक्री केलेल्या दुचाकीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे हवालदार अशोक दुबाले यांना मिळाली. त्यांनी पाेलिस निरीक्षक संतोष साबळे यांना माहिती देऊन आपल्या पथकासह सापळा लावला.
पैस घेण्यासाठी येताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरणे व फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली.