जन्मदात्या बापावर मुलाने झाडल्या गोळ्या; आईला मारहाण केल्याच्या संतापात कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 12:50 PM2021-05-21T12:50:20+5:302021-05-21T12:57:45+5:30
दोन गोळ्या पोटावर झाडण्यात आल्याने वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
आष्टी (जि. बीड): आष्टी शहरातील विनायकनगर भागामध्ये जन्मदात्या बापावर मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना २० मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (वय ५०) असे जखमी पित्याचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (२४) याने घरगुती वादातून बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
तीन महिन्यांपूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्त
संतोष लटपटे हे तीन महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतूनच पोटच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या, तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरू केली होती. आईला मारहाण झाल्याने राग अनावर झाल्याने गोळ्या झाडल्याचे किरण लटपटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.