बीडमध्ये सराफा व्यापाऱ्यास गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:18 AM2019-06-16T00:18:56+5:302019-06-16T00:19:48+5:30
व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली.
बीड : व्यापारी म्हणून आलेल्या इसमाने सोन्याची लगड असल्याचे सांगून शहरातील एका सराफा व्यापा-याला जवळपास दीड लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीडमध्ये घडली. विकत घेतलेली लगड सोन्याची नसून इतर धातुची असल्याचे गुरुवारी लक्षात आल्यानंतर सदर व्यापाºयाला धोका झाल्याचे स्पष्ट झाले.
बीड शहरातील सुभाष रोडलगत असलेल्या कबाड गल्ली भागातील श्रीहरी सुवर्णकार दुकानात मंगळवारी सायंकाळी एक इसम हातात बॅग घेऊन आला. आपले नाव राजेश असून स्वत:ला सोन्याचा व्यापारी असल्याचे व हिंगोली येथून आल्याचे सांगून दुकान मालक श्रीहरी मैड यांना बोलते केले. त्यानंतर बाजारातील इतर काही सराफ्यांची नावे सांगून बॅगमधील चार इंची लांब लगड काढून दाखविली आणि आपल्याला एका सराफा व्यापाºयाने दिली असून पेमेंटची गरज असल्याने विकायची असल्याचे सांगितले.
सराफा बाजारात राजेश नामक एक व्यापारी येत असतो. तसेच बीडमधील काही सराफ्यांची नावे त्याने सांगितल्यामुळे विश्वास ठेवत श्रीहरी मैड यांनी सोन्याची लगड तपासणीसाठी घेतली. एका बाजूने लगड कट करुन खात्री केली असता सोने असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे वजन केले. जवळपास ४३ ग्रॅम १९० मिली सोन्याच्या लगड खरेदी करत त्याचे १ लाख ४२ हजार ६२७ रुपयांचे पेमेंट सदर व्यापा-याला दिले.
बुधवारी साप्ताहिक बंद असल्याने गुरुवारी मैड यांनी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु केले. मंगळवारी राजेश नामक व्यापाºयाकडून खरेदी केलेली लगड मधोमध कट केली असता काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसून येताच मैड यांना धक्का बसला. आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सराफा व्यापारी बांधवांच्या सोशल मीडिया ग्रुपवर हा प्रकार कळविला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणा-या भामट्याचे फोटोदेखील बीडसह औरंगाबाद, परभणील नांदेड भागातील सहमित्रांच्या ग्रुपवर व्हायरल केले. मात्र, त्या भामट्याचा सुगावा लागला नाही. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगून अद्याप पोलिसात तक्रार दिली नसल्याचे सराफा व्यापारी श्रीहरी मैड यांनी सांगितले.
शहरातील ८ ते १० व्यापाऱ्यांचीही झाली यापूर्वी फसवणूक
सोन्याची लगड खरेदी करताना खात्री करण्यासाठी सराफा व्यापारी लगडची एक बाजू कट करतात.
नेमकी ही पद्धत लक्षात घेत भामट्याने विकलेल्या लगडच्या दोन्ही बाजूला थोडे सोने दिसेल अशी चलाखी केलेली होती.
श्रीहरी मैड यांनी एका बाजूने कट केल्याने फसवेगिरी त्यांच्या लक्षात आली नाही.
दागिन्यांतूनही होते सराफांची फसवणूक
येणारे व्यापारी त्यांच्याकडील विविध डिझाइन्सचे सोन्याचे लॉकेट दाखवतात.
मात्र लॉकेटच्या दोन्ही बाजुने असलेल्या कड्या सोन्याच्या असतात
इतर भाग बांधीव असतो, त्यावर सोन्याचे आवरण असते.
त्यामुळे पूर्ण लॉकेट सोन्याचे असल्याचे भासते.