गरिबांचा ‘बर्गर’ महाग झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:36+5:302021-08-27T04:36:36+5:30

नितीन कांबळे कडा : गरीब आणि सामान्यांचा बर्गर असणारा वडापाव सध्या महागला आहे. आष्टी, कडा शहरात वडापावचे दर ...

Burgers became expensive for the poor | गरिबांचा ‘बर्गर’ महाग झाला

गरिबांचा ‘बर्गर’ महाग झाला

Next

नितीन कांबळे

कडा : गरीब आणि सामान्यांचा बर्गर असणारा वडापाव सध्या महागला आहे. आष्टी, कडा शहरात वडापावचे दर वीस रुपयापर्यंत पोहोचले आहेत. सोबतच भजी प्लेटही पाच रुपयांनी महागली आहेत. तेल, बेसन आणि गॅसमध्ये झालेल्या भाववाढीमुळे हे दर वाढवावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाढीव दरामुळे वडापावचे ग्राहक कमी असल्याची खंत काही विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

वड्यासाठी लागणाऱ्या बेसनाच्या दराने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे हाॅटेल व हातगाडीवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली. दहा रुपयात विकणारा वडापाव वीस रुपये, मिसळ तीस रुपयांवरून चाळीस रुपये भजी दहा रुपयांवरून पंधरा रुपये प्लेट, समोसा दर दहावरून पंधरा रुपये झाले आहेत. तेलाच्या दरात साधारण २० ते ३० टक्के दरवाढ झाली आहे तर बेसनाच्या दरात १० ते १५ टक्के वाढ असल्याने खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. अनेक गरीब घटकातील नागरिकांची गुजराणही वडापाववर असते. पण वडापाव महाग झाल्यामुळे तेही हैराण झाले आहेत. सध्या महागाईच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत.

परवडत नसल्याने दरवाढ

कोरोनानंतर वडापावसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. म्हणून पहिल्या किमतीत वडापाव देणे आम्हाला परवडत नसून सध्या ग्राहक कमी झाल्याने दरवाढ करावी लागली.

- कानिफ ढोबळे, वडापाव विक्रेते, कडा

कोरोनाचे संकट, कमी ग्राहक, खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने वडापाव, भजी, मिसळचे दर वाढवावे लागले आहेत. दिवसभरात पहिल्यासारखा धंदा होत नाही.

- संतोष मोरे, वडापाव, मिसळ विक्रेते, कडा

आमच्यासाठी एकवेळचे जेवण

घराच्या बाहेर कामानिमित्त रोजच पडावे लागते. ग्रामीण भागातील बससेवा पहिल्यासारखी नसल्याने आता वाढीव भावाने का होईना वडापाव खाऊनच दिवस घालावा लागत आहे. एकवेळेचे ते आमचे जेवणच असल्याचे कामगार सचिन वाघमारे यांनी सांगितले.

तेल वाढले, बेसन महाग

वस्तू आधीचे दर सध्याचे दर

तेल १६०० २४००

बेसन ८० १००

बटाटे १५ २०

गॅस ५८५ ८७३

Web Title: Burgers became expensive for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.