घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:29 AM2021-02-08T04:29:55+5:302021-02-08T04:29:55+5:30
कडा : घराच्या जवळ व घरात कोणीच नसल्याची संधी साधून भरदिवसा घर फोडून साहित्य चोरून पळणाऱ्या दोघांना गावातील ...
कडा : घराच्या जवळ व घरात कोणीच नसल्याची संधी साधून भरदिवसा घर फोडून साहित्य चोरून पळणाऱ्या दोघांना गावातील तरुणांनी पाठलाग करून पकडल्याची घटना आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे घडली. या चोरट्यांना अंभोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
डोंगरगण येथील शेतकरी दिनकर बाजीराव पवार हे पत्नीसमवेत सराटेवडगाव येथे पाहुण्याच्या सोयरीकीच्या कार्यक्रमाला गेले होते, तर मुलगा नगर येथे काही कामानिमित्त बाहेर गेला होता. रविवारी दुपारी ही संधी साधून रोडलगतच बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून सोने व रोख रक्कम घेऊन चोरटे घरातून बाहेर पडले. दरम्यान, अनोळखी व्यक्तींना पाहताच गावातील तरुणांना ते चोर असल्याचा संशय येताच त्यांचा पाठलाग करून दोन चोरांना ताब्यात घेतले. मात्र, दुचाकीवर बसलेला एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे, प्रल्हाद देवडे घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व चोरट्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मागील काही दिवसापांसून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात घरफोड्या करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. ग्रास्थांनी पकडून दिलेल्या चोरट्यांची कसून चौकशी केल्यास अन्य घरफोड्यांचे धागेदोरे देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.