आष्टीत भर दिवसा घरफोडी; दिड लाख रुपयांसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:18 PM2021-03-15T19:18:55+5:302021-03-15T19:19:49+5:30
आष्टी शहरात पहाटे आणि भर दुपारी दोन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला
कडा ( बीड ) : घरात कोणीच नसल्याचा डाव साधून आष्टी येथील पंचायत समितीसमोरील भागातील एका घरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रा.नवनाथ विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून ही चोरी झाली असून चोरट्यांनी १ लाख ४० हजाराची रोख रक्कम आणि एक तोळे सोनं लंपास केले.
याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मुर्शदपूर भागात प्रा.नवनाथ विधाते यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सर्व सदस्य आज मुळगावी नांदूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. घरातील १ लाख ४० हजार रोख रक्कम आणि एक तोळ्याची सोन्याची चैन चोरली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पहाटे सुद्धा फोडले एक घर
आष्टी शहरातील सायकड गल्ली येथील आर.सी.खुळपे या शिक्षकाच्या घरीही कोणी नसल्याची संधी साधून सोमवारी पहाटे चोरट्यांनी चोरी केली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास तीन तोळं सोने आणि दहा हजार रूपये रोख ऐवेज लंपास केला आहे. या दोन्ही घटनास्थळावर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पो.ना.मच्छिंद्र उबाळे, अमोल ढवळे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.