विजेच्या धक्क्याने तरुण जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:17+5:302021-03-16T04:33:17+5:30
बीड : जनावरांना पाणी पाजायचे होते. मात्र, वीज नसल्यामुळे फ्यूज टाकत असताना रोहित्राचा स्फोट झाल्याने एक तरुण विजेच्या ...
बीड : जनावरांना पाणी पाजायचे होते. मात्र, वीज नसल्यामुळे फ्यूज टाकत असताना रोहित्राचा स्फोट झाल्याने एक तरुण विजेच्या तीव्र धक्क्याने ठार झाला. ही घटना बीड तालुक्यातील आहेर वडगाव शिवारात १५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. एकुलता एक मुलगा असल्यामुळे यावेळी आई वडिलांनी एकच टाहो फोडला होता.
गणेश सुनील तावरे (वय २१) असे विजेच्या धक्क्याने ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. त्याचे वडील सुनील तावरे व आई आहेरवडगाव शिवारातील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतात. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्यामुळे तो वडिलांकडे आहेरवडगाव शिवारातील शेतात राहात होता. त्यांना तो शेतातील कामांमध्ये मदत करत होता. सोमवारी सकाळपासूनच सर्वजण शेतातील रोजची कामे करत होते. दरम्यान, जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हते. मात्र, रोहित्रामधील फ्यूज गेेलेला असल्यामुळे गणेश हा फ्यूज टाकण्यासाठी रोहित्राजवळ गेला. त्यावेळी अचानक शॉर्टसर्किट झाले व विजेचा तीव्र धक्का गणेशला लागला. क्षणार्धात त्याचा या घटनेत मृत्यू झाला. परिसरातील गवत वाळलेले असल्यामुळे मोठी आग त्याठिकाणी लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश जळालेल्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तब्बल दोन तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी पाठवला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी
महावितरणकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील वायरमन त्याठिकाणी येऊन दुरुस्ती करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:लाच सर्व दुरुस्ती करावी लागते. या कारणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. वेळेवर दुरुस्ती केली असती तर गणेशचा जीव वाचला असता, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.