बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील
By सोमनाथ खताळ | Published: February 26, 2024 12:23 PM2024-02-26T12:23:33+5:302024-02-26T12:24:41+5:30
मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीड/छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस पेटविल्यानंतर बीड जिल्हाही सतर्क झाला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डरही सील करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून आता कठोर पाऊले उचलली जात असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात बस, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
३० ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर बीड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही दिवस प्रकरण शांत झाल्यानंतर रविवारपासून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे समाज आक्रमक झाला असून पुन्हा एकदा दगडफेक, जाळपोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर आज सकाळीच सील करण्यात आली आहे. शिवाय २८ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत १०० टक्के इंटरनेट बंद केले जाणार आहे. नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन प्रशासन व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
बस, इंटरनेट सेवा बंद
बीड, जालना , छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बससेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून तिन्ही जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद पुढील दहा तास बंद करण्यात आली आहे.
वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू होणार
बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यासाठी पत्र दिलेले आहे. हळुहळू सर्व इंटरनेट बंद होईल. आज रात्रीपर्यंत तरी ही सेवा बंद राहिल. वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू केली जाईल आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्यात आणखी वाढ केली जाईल.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड