बस पेटली, पळा...पळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:57 PM2019-12-27T23:57:52+5:302019-12-28T00:00:04+5:30
नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले.
नितीन कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले. तर वारंवार ब्रेक मारावे लागल्याने लायनर गरम होऊन बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. महिनाभरात अशा प्रकारचा तालुक्यातील हा दुसरा अपघात आहे.
नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सची बस गुरु वारी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ३४ प्रवासी घेऊन निघाली होती. रात्री अकरा वाजता परळी येथे चहा नाष्टा करून पुढे डोंगरिकन्ही येथे काही वेळ थांबुन परत चहा पाणी करून ही बस पुण्याकडे निघाली. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्र वारी पहाटे दोनच्या सुमारास बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगवधान राखले, त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.
ही घटना घडताच जवळच गव्हाच्या शेताला पाणी देणारे समीर शेख यांनी तिकडे धाव घेत मित्रांना फोन करून कळविले. आग विझवण्यासाठी धनंजय भोसले, माऊली खिलारे , राजु भोसले, उध्दव खिलारे , सद्दाम शेख व परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सोने, भ्रमणध्वनी, पिशव्या, सुटकेस असे तीन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. सोने मोबाईल, बॅग मधील साहित्य असे एकुण तीन लाखांच्या घरात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.
याच रस्त्यावर महिन्यात दुसरी घटना
वीस दिवसा पुर्वी बीड धामणगाव- नगर रोडवर कापशी येथे नगर येथून चिंचपूरकडे जाणारा एका ट्रक अचानक आग लागून जळून खाक झाला होता. याच रोडवर शुक्रवारी पहाटे ही दुसरी घटना घडली. दोन्ही घटनेत जिवीत हानी घडली नसून वाहने मात्र पुर्णपणे जळाली आहेत. चढ उताराचा हा रस्ता असल्याने कमी जास्त प्रमाणात ब्रेक मारावे लागते. सारखे सारखे ब्रेक दाबावे लागत असल्याने लायनरवर दाब येतो. आणि याच दाबामुळे ते गरम झाल्याने अचानक आग लागून पेट घेऊन गाडी पुर्णपणे जळाली.
गॅस संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाही
लक्झरी बसमध्ये आगीच्या घटना घडल्या तर अग्निशमन यंत्राची व्यवस्था असते. पण चालक याची खात्री करत नाहीत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर ती विझवायला यंत्र हातात घेताच रिकामे असल्याने ती आग आटोक्यात येऊ शकली नाही.
पाणी टाकूनही गाडी पुर्णपणे जळाली असल्याचे चालक अशोक बोराडे यांनी सांगितले.