बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:11+5:302021-08-26T04:35:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अनलॉकनंतर आता एसटीबसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर पॉपकॉर्नसह खारेमुरे विकणाऱ्यांच्या हाताला राेजगार मिळू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनलॉकनंतर आता एसटीबसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर पॉपकॉर्नसह खारेमुरे विकणाऱ्यांच्या हाताला राेजगार मिळू लागला आहे. त्यांच्या संसाराची गाडीही पुन्हा रुळांवर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. कोरोनात या हॉकर्स लोकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. बीड बसस्थानकात परवानाधारक विक्रेत्यांची संख्या जवळपास १५ आहे. तसेच हातावर पोट असणाऱ्या परंतु नाेंद नसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पाण्याची बाटली, गोळ्या, पाकीट विक्री, खारेमुरे, पॉपकॉर्न, वडापाव, चिवडा, रस, ज्यूस आदींची विक्री करून दिवसाला २०० ते ३०० रुपये घरी घेऊन जाणारे हॉकर्स, विक्रेते कोरोनामुळे चांगलेच परेशान झाले होते. हातावर पोट असल्याने या लोकांचा रोजगार बंद झाला होता. आता अनलॉकनंतर बसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे या हॉकर्सच्या संसारांची गाडी पुन्हा रुळांवर आली आहे. या लोकांना आता रोजगार मिळू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
----
एसटी महामंडळाला द्यावे लागते शुल्क
जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात हॉकर्स आहेत. या सर्वांकडून महिना अथवा वर्षाला एसटी महामंडळाकडून शुल्क आकारले जात आहे. कोरोनाकाळातील शुल्क देण्याबाबत विक्रेत्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. हे शुल्क माफ करावे, अशी मागणी परवानाधारकांमधून होत आहे.
---
कोरोनाच्या अगोदर पाणीबाटल्या विकल्यानंतर दिवसाकाठी कसेही २०० ते ३०० रुपये मिळत होतेे. परंतु, बसेस कोरोनामुळे थांबल्या आणि आमचा रोजगारही थांबला. आम्हाला वर्षभर खूप अडचणी आल्या. आता बसेस धावू लागल्याने आम्हालाही चार पैसे मिळू लागले आहेत. यामुळे समाधानी आहोत.
-गणेश पारीख, विक्रेता
---
खाद्यपदार्थ घेण्यास पूर्वी खूप प्रतिसाद होता. आता कोरोनाच्या भीतीने लोक खरेदी करायला आखडता हात घेत आहेत. पूर्वीपेक्षा पदार्थ घेण्यास ४० ते ५० टक्केच प्रतिसाद आहे. घसा कोरडा पडेपर्यंत ओरडले तरी कोणीच खरेदी करत नाही.
- माणिकराव पांढरे, विक्रेता