बस लोकेशनचे ॲप लाँचिंग लांबणीवर, मंत्र्यांच्या ‘डबल बेल’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:44+5:302021-08-24T04:37:44+5:30
बीड : अनलॉकनंतर एसटी मार्गावर आली असून प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक बसची लाइव्ह वेळ कळावी यासाठी सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग ...
बीड : अनलॉकनंतर एसटी मार्गावर आली असून प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक बसची लाइव्ह वेळ कळावी यासाठी सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आली. या प्रणालीचे तसेच प्रवाशांना माहिती देणाऱ्या ॲपचे लोकार्पण १५ ऑगस्टला होणार होते. ते न झाल्याने एसटी बसचे लोकेशन घरबसल्या पाहण्याचा मुहूर्त लांबला आहे. याचे कारण ‘तांत्रिक अडचणी’ असे सांगितले जात असले तरी मंत्र्यांकडून तारखेची ‘डबल बेल’ न वाजल्याने हा मुहूर्त लांबल्याचे बोलले जात आहे. रापमच्या बीड विभागातील ५३९ बसला व्हीटीएस कार्यन्वित केले असून प्रवासी माहितीचे ॲप येत्या काही दिवसांत लोकार्पण होणार असल्याचे सांगण्यात आले.
५३९ बसना बसविली व्हीटीएस
आगार एकूण बस यंत्रणा बसविलेल्या बस
बीड १०९ १०९
गेवराई ६२ ६२
परळी ६८ ६८
अंबाजोगाई ८२ ८२
माजलगाव ५८ ५८
पाटोदा ५० ५०
धारूर ५५ ५५
आष्टी ५५ ५५
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
रापमच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ॲप विकसित केले जात आहे. याद्वारे प्रवाशाला कोठून कोठे जायचे यासाठी त्या मार्गावरून काेणती बस कधी जाणार, बसचे चालक, वाहकांचे मोबाइल क्रमांक, बॅच नंबर आदी लोकेशन मायक्रो मॅपप्रमाणे उपलब्ध होणार आहे. हे ॲप १५ ऑगस्टला लाँच होणार होते. आता ते लांबणीवर पडले आहे.
बस कुठे हे आधीच कळणार
व्हेईकल ट्रेकिंग सिस्टममुळे प्रवाशांना बस ट्रॅक करता येणार आहे. त्यावरून लागणाऱ्या वेळेनुसार प्रवासाचे नियोजन सुलभ होणार आहे. ५०० मीटर परिसरात बस येताच ती कोणती हे स्थानकावरील स्क्रीनवर दिसणार असून कुठे जाणार आहे? कोणत्या फलाटावर लागणार आहे? याची सूचना प्रवाशांना मिळणार आहे.
थोडा अवकाश आहे
बीड विभागातील बसना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम कार्यान्वित आहे. पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये ग्रामीण भागातील अंतिम टप्प्यापर्यंतचे लोकेशन, चालक, वाहकांच्या क्रमांकाची माहिती कार्यान्वित करणे सुरू आहे. काही तांत्रिक कारणाँमुळे ॲप लाँचिंगला अवकाश आहे.
-अजयकुमार मोरे, विभाग नियंत्रक, बीड.