बस धावली अन विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 05:55 PM2021-10-22T17:55:56+5:302021-10-22T17:57:14+5:30
लोकमतच्या वृत्ताची दखल विद्य्यार्थीची गैरसोय दुर, मार्गावर बस सुरू
- नितीन कांबळे
कडा (बीड ) : बसअभावी कडा-लिंबोडी-खिळद-पाटण रस्त्यावर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रिक्षा,जीपला लटकून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित होताच आज सकाळपासून या मार्गावर आष्टी आगाराने बस सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबला असून पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत. कडा-लिंबोडी-खिळद-पाटण या परिसरातून शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्खा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या मार्गावर केवळ चारच बस असल्याने अनेक ठिकाणी बस वेळेवर पोहचत नव्हती. बससेवा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिवसभर उपासमार करत ताटकळत बसावे लागत होते. तर कधी नाईलाजास्तव रिक्षा,जीपला लटकत जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित केले.
आष्टी आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन आजपासून या मार्गावर बस सुरू केल्या. या बसला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी बसला प्राधान्य द्यावे असे आवाहन आगार प्रमुख संतोष डोके केले आहे.