लॉकडाऊनमध्ये व्यवसाय अंगलट ; दहा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:11+5:302021-05-17T04:32:11+5:30
गेवराई : तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने यात आता पुन्हा १५ ते २५ मे पर्यंत ...
गेवराई : तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने यात आता पुन्हा १५ ते २५ मे पर्यंत दहा दिवसाचा कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रविवारी परवानगी नसतानादेखील आपली दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करीत दहा दुकाने सील करण्यात आल्या. तर विनाकारण फिरणाऱ्या ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुरवार यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यात कोरोना रोगाचा उद्रेक वाढत चालल्याने यास आळा बसावा म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १५ ते २५ मे पर्यंत पुन्हा कडक लाॅकडाऊन जारी केला. त्यानुसार सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान रविवारी सकाळी शहरातील काही दुकाने व्यवसायासाठी सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुरवार, उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, पोलीस शरद बहिरवाळ, भागवत येवले, नानासाहेब कटारनवरे, ज्ञानेश्वर सौंदरमल, गणेश मिसाळ व कर्मचाऱ्यांनी मिळून शहरात उघडी असलेली सराफा दुकान, कापड, जनरल स्टोअर्स, पान सेंटर अशा एकूण दहा मालकांवर कारवाई करीत त्यांची दुकाने सील करण्यात आली. तसेच शहरात विनाकारण व विनामास्क फिरताना आढळलेल्या ३४ नागरिकांना प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे ६ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे लॉकडाऊनमध्ये चोरून लपून व्यवसाय करणारे तसेच दुकाने उघडी ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशी कारवाई शहरात आता दररोज राबवली जाणार असून व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवावी, नसता शासन निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल अशी तंबी मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुरवार यांनी दिली.
फोटो ओळी : गेवराई शहरात लॉकडाऊनमध्ये सुरू असलेली दहा दुकाने नगर परिषद व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत सील करण्यात आली.
===Photopath===
160521\sakharam shinde_img-20210516-wa0015_14.jpg~160521\sakharam shinde_img-20210516-wa0019_14.jpg