गेवराईत चोरट्याच्या हल्ल्यात व्यापारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:00 AM2020-02-09T00:00:30+5:302020-02-09T00:01:19+5:30
गेवराई : शहरातील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या एका जणावर चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सदरील इसम ...
गेवराई : शहरातील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या एका जणावर चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून, आरडाओरड झाल्याने याठिकाणाहून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील कापड व्यापारी अब्दुल शफिक अब्दुल कादर यांचे शास्त्री चौकात कपड्याचे शोरुम असून ते मोमीनपुरा भागात वास्तव्यास आहेत. दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता एका चोरट्याने अब्दुल शफिक यांच्या घरात प्रवेश केला. याच दरम्यान शफीक यांना जाग आली असता, त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर चोरट्यांनी हातात असलेल्या शस्त्राने हल्ला चढवला. अब्दुल यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्याने तेथून पोबारा केला. या हल्ल्यात अब्दुल शफिक हे गंभीर जखमी झाले असून, नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चोरट्यांची दहशत
गेवराई शहरात प्रत्येत दीड-दोन महिण्याच्या ठराविक अंतराने चोरटे विविध ठिकाणी हल्ला करत जबरी चोरी करतात किंवा प्रयत्न करतात. चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटना घडत असताना गेवराई पोलिसांना तपास मात्र लागलेला नाही. विशेष करून मागील तीन-चार महिण्याच्या कालावधीत चार चोरीच्या घटना या मोमीनपुरा, धनगरगल्ली भागात घडलेल्या आहेत. या भागातील नागरिक मोठ्या दहशतीखाली असतानाच शनिवारी पुन्हा चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने अब्दुल शफिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
आमदारांनी काढला होता मोर्चा
गेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी वाढत्या चोरी, दरोडे, हल्ला व इतर गुन्ह्यांमधील होत असलेल्या वाढ यावर पोलिसांकडून हो नसलेली योग्य कारवाई व प्रतिबंधात्मक उपापयोजना या विरोधात हजारो लोकांचा मोर्चा काढला होता. यानंतर पोलीस ठाणे प्रमुख देखील बदलण्यात आले होते. मात्र, तरी देखील चोरी व इतर गुन्हे घडत आहेत. पोलिसांनी योग्य उपायोजना करून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.