अंबाजोगाई-केज रस्त्यावर व्यापा-याला कारने चिरडून सोन्याची बॅग लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:15 AM2018-02-14T01:15:08+5:302018-02-14T01:16:54+5:30
बीड/केज : कुंबेफळहून (ता.केज) काम आटोपून अंबाजोगाईकडे निघालेल्या विकास थोरात या सराफा व्यापा-याच्या अंगावर कार घालून सोन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली. यात हा व्यापारी जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
बीड/केज : कुंबेफळहून (ता.केज) काम आटोपून अंबाजोगाईकडे निघालेल्या विकास थोरात या सराफा व्यापा-याच्या अंगावर कार घालून सोन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली. यात हा व्यापारी जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. व्यापा-याला लुटून पळ काढताना एक चोरटा विहिरीत पडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थोरात यांचे केज तालुक्यातील कुंबेफळ येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते आपल्या दुकानाचे काम आटोपून दुचाकीवरुन एकटेच अंबाजोगाईकडे निघाले होते. याचवेळी कार (एमएच०९/एबी६८४७) मधून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. तसेच त्यांच्या अंगावरुन गाडी घालून ठार केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिण्यांची बॅग घेऊन पळ काढला. हा प्रकार परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु ते हाती लागले नाहीत. याच नागरिकांनी परिसरातील गावांना घटनेची माहिती दिली.
या चोरट्यांची कार धनेगाव रोडवर बंद पडली. चार ते पाच चोरटे कार ढकलून चालू करण्याचा प्रयत्न करीत असतानाच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे, मयूर टोणपे, शामसुंदर खोडसे, औदुंबर रांजकर, मयूर कदम यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी विचारपूस करताच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्यात वादावादीही झाली. एवढ्यात एका चोराने कारमधून पिस्तूल काढत मारण्याची धमकी दिली. तोपर्यंत जमाव जमल्याने चोरट्यांनी पळ काढला. एवढ्यात अंधारातून सैरावैरा पळणाºया चोरट्यांपैकी एकजण विहिरीत पडला तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. विहिरीत पडलेल्या चोरट्याची युसूफवडगाव ठाण्याला माहिती देण्यात आली.
त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत दोरी सोडून चोरट्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन सोन्याची बॅगही हस्तगत केल्याचे देशपांडे यांनी सांगितले. मयत सराफा व्यापारी विकास थोरात हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे पुतणे होते. कुंबेफळ येथील ग्रा.पं. निवडणुकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता.
पाळत ठेवून लुटण्याचा प्रकार
विकास थोरात हे नेहमीच दुचाकीवरुन अंबाजोगाईला जात असल्याची माहिती चोरट्यांना असावी. मंगळवारी ते दुचाकीवरुन एकटेच जात असल्याचा फायदा घेत त्यांच्या अंगावर कार घालून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्याची बॅग लंपास केली. हा सर्व प्रकार पाळत ठेवून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.