व्यापार्याला कारने चिरडून लुटणा-या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांनी चार तासांत ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:19 AM2018-02-14T11:19:37+5:302018-02-14T11:20:12+5:30
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर अवघ्या चार तासांत इतर तीन चोरट्यांना बेड्या ठोकत बीड पोलिसांनी लुटारू टोळीचा पर्दाफाश केला.
बीड : केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर अवघ्या चार तासांत इतर तीन चोरट्यांना बेड्या ठोकत बीड पोलिसांनी लुटारू टोळीचा पर्दाफाश केला.
विकास थोरात यांचे कुंबेफळ येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि आपल्या दुचाकीवरून एकटेच अंबाजोगाईकडे निघाले. धनेगाव फाट्याजवळ पाठिमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठारे झाले. चोरट्यांनी त्यांच्या जवळील दागिन्यांची बॅग घेऊन पळ काढला होता. परंतु त्यांची कार धनेगावजवळ आल्यावर बंद पडली. परिसरातील नागरिकांनी त्यांना हटकल्यानंतर त्यातील एका चोरट्याने बंदुक दाखवित मारण्याची धमकी दिली. एवढ्यात जमाव वाढल्याने चोरट्यांनी पळ काढला. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता.
दरम्यान, या घटनेचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांनी यंत्रणा कामाला लावली. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, युसूफवडगाव पोलीस, केज पोलीसांसह विशेष पोलीस कर्मचारी या चोरट्यांच्या तपासासाठी रवाना झाले. पूर्ण केज तालुक्यात सर्वत्र सापळा लावला. सर्व पिकांमध्ये जावून झडती घेतली. याचवेळी उसाच्या शेतात लपलेल्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. रात्रभर पोलीस आणि चोर यांच्यात धरपकड सुरूच होती. मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. यातील एका चोरट्यावर खूनाचा तर दुसर्यावर खूनाचा प्रयत्न करणे व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनश्याम पाळवदे व त्यांची टिम, युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे व त्यांची टिम तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, केज पोलीस, अंबाजोगाई पोलीस यांनी केली.