धारूर घाटात दुचाकी बस अपघात, वृद्ध महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 AM2019-07-16T00:42:55+5:302019-07-16T00:43:33+5:30
येथून सोनीमोहाकडे जाताना घाटात दुचाकी, बस, कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये सोमवारी ५ वाजता घडली. दुचाकीस्वार जखमी झाली असून त्याच्यावर धारूर रुग्णालयात उपचार करून स्वराती रूग्णालय अंबाजोगाई येथे उपचार करण्यात येत आहेत .
धारुर : येथून सोनीमोहाकडे जाताना घाटात दुचाकी, बस, कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये सोमवारी ५ वाजता घडली. दुचाकीस्वार जखमी झाली असून त्याच्यावर धारूर रुग्णालयात उपचार करून स्वराती रूग्णालय अंबाजोगाई येथे उपचार करण्यात येत आहेत .
शिवकांता गणपती सातभाई (वय ६० वर्षे, रा. तडोळी, ता. पसळी) असे मयत महिलेच नाव आहे. मच्छिंद्र भाऊराव तोंडे (रा. सोनीमोहा) हा जखमी झाला आहे. शिवकांता सातभाई या आसोला येथे मुलीस भेटण्यास आठ दिवसांपूर्वी आल्या होत्या. आसोला येथे आठ दिवस थांबून परत जात असतांना धारूर येथे सोनीमोहा येथील नातजावई मच्छिंद्र तोंडे यांची भेट झाली. त्यांच्यासोबत नातीस भेटण्यास सोनीमोहा येथे दुचाकी (एम.एच.४४-८२८५) वरुन जात होत्या.
धारूर घाटात दुचाकीला एका कंटेनरची धडक झाली. यावेळी शिवकांता या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एस.टी. बस (एमएच २०/००६८) चे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे मच्छिंद्र तोंडे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रूग्णालय दाखल केले आहे.