माजलगावात व्यापार्यांकडून कवडीमोल भावाने तूर खरेदी; शेतकरी शासकिय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 07:43 PM2018-01-15T19:43:36+5:302018-01-15T19:46:31+5:30
बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्यांना खाजगी व्यापार्यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे.
माजलगाव,( बीड ) : बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्यांना खाजगी व्यापार्यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी व खरेदी विक्री संघाने शासकीय खरेदी केंद्र सुरुकरण्याची मागणी केली आहे.
या वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुर पिकाची लागवड झालेली आहे. हे तुर पिकाची काढणी मागील आठ दिवसापासून सुरू झाली आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव खाजगी बाजारपेठेत मिळत नाही. हमीभाव 5 हजार 450 रूपये असतांना खाजगी व्यापार्यांकडून केवळ 4600 रूपये प्रतिक्विंटल प्रमाणेच भाव मिळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना आर्थिक फटका बसत असून शासनाने तात्काळ शासकिय खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्यांच्या तुरीला हमीभाव देवून व्यापार्यांकडून होत असलेल्या आर्थिक लुट थांबवावी अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
खरेदी विक्री संघाची मागणी
यासोबतच शेतक-यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव यांनी बीड जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडे केली आहे.